हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. ३ : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी डबके साचून पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जलजन्य आजार मोठय़ा प्रमाणात वाढले असून, रुग्णालयात तापेच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यात मलेरियाचे रुग्ण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.बुलडाणा जिल्ह्यात सन २0१४ मध्ये २0८ रुग्ण होते, तर २0१५ मध्ये १३४ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी मागील ६ महिन्यांत १६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या व्यापक जनजागृती आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे ही रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचून पाण्याची दुर्गंंधी पसरली आहे. ग्रामीण भागातही सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तापेचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढले असून खासगीसह प्राथमिक व जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात मागील सहा महिन्यांत तपासणीसाठी रक्त नमुने कमी आले असले, तरी या महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मलेरियाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी मागील सहा महिन्यांत २ लाख १0 हजार ७९४ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली. त्यात जानेवारी महिन्यात ३४ हजार ९७९, फेब्रुवारी ३८ हजार ९0९, मार्च ३७ हजार ६१४, एप्रिल ३0 हजार ५0८, मे ३१ हजार ३३६, जून ३७ हजार ४५१ रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणी नमुन्यात १६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. त्यांची विशेष काळजी घेऊन उपचार करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत मलेरियामुळे एकही मृत्यूची घटना घडली नाही. डेंग्यू, चिकन गुनियाचा एकही रुग्ण नाही!सन २0१६ मध्ये मागील सहा महिन्यांत पाच रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन तपासणी करण्यासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यात एकही रुग्ण डेंग्यू किंवा चिकन गुनियाचा आढळून आला नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत एकही मृत्यूची घटना घडली नाही.
संततधार पावसामुळे मलेरियाचे रूग्ण वाढणार!
By admin | Published: August 04, 2016 1:08 AM