पावसाअभावी पिके सुुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:41+5:302021-08-15T04:35:41+5:30

आश्विन सानप किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी ...

Due to lack of rain, the crops started drying up | पावसाअभावी पिके सुुकू लागली

पावसाअभावी पिके सुुकू लागली

Next

आश्विन सानप

किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. कधी पाऊस पडणार, असा प्रश्न या परिसरातील बळीराजांना पडला असून, याकरिता आभाळाकडे आस लावून बसले आहेत.

किनगाव राजा व आजूबाजूला हिवरखेड, विझोरा ,पळसखेड ,पांगरी उगले, शेलगाव राऊत, पिंपळगाव परिसरात यंदा मान्सूनचे आगमन जूनमध्ये न होता तब्बल एक महिना उशिरा जुलैमध्ये झाले होते. तरीही येथील शेतकऱ्यांनी हिमतीने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारीची पेरणी केली. उगवून आलेल्या पिकांच्या वाढीसाठी आपापल्या पद्धतीने स्वतःजवळ असलेल्या ठिबक तसेच तुषार सिंचनाद्वारे विहिरीचे पाणीही दिले होते. दरम्यान, मध्यंतरी १३ जुलै रोजी या भागात दमदार पाऊस पडल्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली होती. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनला शेंगा आल्या आहेत, तर मूग वाधीमध्ये आला आहे. परंतु १६ जुलैपासून पावसाने दडी मारली आहे. सोयाबीन तसेच मुगाच्या शेंगा दाण्याने भरण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्याने विहिरींचेही पाणी आटले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांजवळ सध्या कुठलीच व्यवस्था नाही. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यावाचून गमावले जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या चेहेऱ्यावर दिसत आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

कोरोना महामारीमुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या बेजार झालेल्या किनगाव राजा व परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षी तरी चांगला पाऊस पडून चार पैसे मिळेल अशी आशा होती; परंतु गेल्या वीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चिंता व भीती निर्माण केली आहे. १७ ऑगस्टनंतर पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाने दांडी मारल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

अत्यल्प पावसात हिमतीने सोयाबीनची पेरणी केली. परंतु उगवून न आल्यामुळे दुबार पेरणी केली. सध्या पीक फुलात आहे; परंतु मागील वीस दिवसांपासून पाऊस न पडल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

गजानन मुंढे, शेतकरी

पळसखेड चक्का

सोयाबीन पिकासह भेंडी लावली आहे. महागडी औषधे आणि रासायनिक खते वापरली आहेत. खूप खर्च झाला आहे; परंतु ऐनवेळी पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील माल पावसाअभावी सुकू लागला आहे.

रामेश्वर काकड, शेतकरी, किनगाव राजा

Web Title: Due to lack of rain, the crops started drying up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.