वादातून केळीचे पीक पेटवले, सात लाखांचे नुकसान
By सदानंद सिरसाट | Published: April 2, 2024 03:56 PM2024-04-02T15:56:52+5:302024-04-02T15:58:02+5:30
दोन आरोपींवर गुन्हा दाखल : कृषी विभागाने केला पंचनामा
सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा): शेती खरेदीच्या वादातून न्यायालयात प्रलंबित प्रकरणामुळे शेजारी दोघांनी दोन एकर शेतातील तयार झालेले केळीचे पीक आग लावून पेटवून दिल्याची घटना सोमवारी तालुक्यातील पळशी बु. शिवारात घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गावातील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पळशी बु. येथील समीर गणेश चव्हाण (२५) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये त्यांचे वडील गणेश चव्हाण यांच्या नावे पळशी बु. शिवारातील गट क्रमांक २८ मध्ये ३ हे. ६१ आर शेती आहे. त्यापैकी दोन एकर शेती हसन कैलास चव्हाण याला विक्री केली. त्यामध्ये फसवणूक झाल्याचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यावरून त्यांच्यात वाद आहेत. त्याच गटातील दोन एकर शेतात त्यांनी केळी पीक केले आहे.
ते तयार झाले असताना सोमवारी हसन कैलास चव्हाण, रामा महादेव चव्हाण यांनी सकाळी ते पेटवून दिले. याबाबतची माहिती फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना दिली. त्यावरून त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता केळी पीक व इतर सिंचन साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून आले. त्यावरून त्यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये केळी पीक सहा लाख रुपये व सिंचनाचे साहित्य मिळून ७ लाख २० रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ४३५(३४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.