वनतळ्याऐवजी खोदले खड्डे : प्रादेशिक वनविभागाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:23 PM2018-12-26T14:23:53+5:302018-12-26T14:24:59+5:30
वरवट बकाल क्षेत्रात प्रादेशिक वनविभागाकडून वन तळ्यांऐवजी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
- अझहर अली
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला संग्रामपूर तालुक्यात भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्याचे दिसते. तालुक्यातील वरवट बकाल क्षेत्रात प्रादेशिक वनविभागाकडून वन तळ्यांऐवजी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन २०१६-१७ मध्ये प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद अंतर्गत वरवट बकाल- भेंडवळ बीटमध्ये आस्वंद, कळमखेड, वरवट खंडेराव या तीन शिवारात वनतळे खोदण्यात आले. मात्र, वनतळ्याचे काम पुर्णत्वास न नेल्याने या ठिकाणी खड्डेच आहेत. त्यामुळे शासन निधीचा ुदुरूपयोग होत असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे. या कामावर एकूण १४ लक्ष ३९ हजार ८४० रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे या निधीचा दुरूपयोग झाल्याचे दिसून येते. तर वरवट बकाल क्षेत्रातील भेंडवळ बीट मधील आस्वंद कंपार्टमेंट नंबर ४३७ मध्ये एक वनतळे खोदण्यात आले.
यावर दोन लक्ष ८७ हजार ९६८ रूपये खर्च करण्यात आले. तर कळमखेड कंपार्टमेंट नंबर ४१३ येथे शेत तळे खोदण्यात आले. तसेच वरवट खंडेराव येथेही ४३१ मध्येही दोन शेततळे करण्यात आले. तळ्यावर ६ लाख ७५ हजार ९३६ रुपयांचा खर्च करण्यात आला. शासन निधीचा गैरवापर करण्यात आल्याने याठिकाणी सद्यस्थितीत खड्डेच दिसून येत आहेत.
त्यामुळे या वनतळ्यांचा शेती आणि वनप्राण्यांना काहीच उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे लक्षावधी रूपयांचा खर्च तरी कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर वनतळ्यांची कामे दोन वषार्पुर्वी झालेले असुन ते खड्डे नसुन वनतळेच आहे व तेथील सर्व कामे नियमाप्रमाणे करण्यात आलेले आहे. जलयुक्तशिवार अभियान अंतर्गत राज्याची कमेटी चार वेळा येऊन कामे बघुन गेली. खोदलेल्या वनतळ्यावरून दोन पावसाळे निघुन गेली असुन बरेच पाणी त्यामध्ये साचले होते.
- एन एस कांबळे
वनपरीक्षेत्र अधिकारी वन प्रादेशिक कार्यालय, जळगाव जा.
वनविभागाने वनतळयाऐवजी खड्डे खोदुन शासनाच्या महत्वकांक्षी योजनेत शासकीय निधीची लुट केली. या कामाची चौकशी करण्यात यावी
- विनोद गाळकर
जलदुत, वरवट खंडेराव