आश्रम : विद्यार्जनासारखे पवित्र व आनंददायी सुख नाही. विद्यार्जनामुळे माणसाच्या वैचारिक प्रगल्भतेत वाढ होते. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळे कोणतेही यश सहज प्राप्त करता येते. विद्यार्थ्यांनो आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करा, असे प्रतिपादन विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य के. डी. पाटील यांनी शुक्रवारी केले. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभाप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य के. डी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आश्रमाचे कार्यकर्ते सुभाष गणगणे, डॉ. धांडे आदी उपस्थित होते. प.पू.शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम सारख्या खेड्यात शिक्षणाचे मोठे दालन निर्माण केले. या शैक्षणिक संकुलाचा आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला. विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण समारंभात ३२ विद्यार्थ्यांना विज्ञान स्नातकाची पदवी प्रदान करण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. मनोज मुऱ्हेकर, प्रा. समता कस्तुरे, प्रा. गजानन गायकवाड, प्रा. अमोल शेळके, प्रा. किशोर गवई, प्रा. मधुरा सातपुते ,सौरभ आंबेकर,प्रा. अरुण फाजगे, प्रा. अमोल मेटांगळे, प्रा. स्वाती परमाळे, प्रा. नितीन धांडे, प्रा. सागर म्हस्के, प्रा. ज्ञानेश्वर गाडे, प्रा. डी. एन. पवार यांनी अथक प्रयत्न केले. प्रास्ताविक जयप्रकाश सोळंकी यांनी केले तर संचालन प्रा. मनीषा कुडके यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. समता कस्तुरे यांनी मानले.
ध्येय निश्चित करून वेळेचे नियोजन करा
आजचे युग हे अत्यंत स्पर्धेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अजूनही पाहिजे तेवढया प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळला नाही. कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यासाचे नियोजन सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी ध्येय ठरवून वेळेचे नियोजन करावे असे सचिव संतोष गोरे यांनी मार्गदर्शन प्रसंगी सांगितले.