इलेक्ट्रीक वाहनांचे कार्यालयातच होते चार्जिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:50 PM2020-08-05T12:50:52+5:302020-08-05T12:51:01+5:30
ईलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी कार्यालयातील विजेचा दुरूपयोग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पेट्रोल वाहनांना पर्याय म्हणून अनेकांची ईलेक्ट्रीक वाहनांना पसंती आहे. खामगावात देखील या वाहनांकडे एक पर्याय म्हणून पाहल्या जात असतानाच, ईलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी कार्यालयातील विजेचा दुरूपयोग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उघडकीस आला आहे.
पेट्रोल वाहनांना सुलभ पर्याय म्हणून गत काही वर्षांपासून ईलेक्ट्रीक आणि रिचार्जेबल वाहनांना अनेकांकडून पसंती दिली जात आहे. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत काही कर्मचाऱ्यांनीही इलेक्ट्रानिक्स वाहने खरेदी केली आहेत. आता ही वाहने चार्जिंग करण्यासाठी चक्क शासकीय रूग्णालयातील वीजेचा वापर या कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहे.. याकडे वरिष्ठांचे दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
एका गाडीच्या चार्जिंगसाठी लागतात ३ युनिट!
ईलेक्ट्रानिक्स वाहनाची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सामान्यपणे ८-९ तास लागतात. ८-९ तासात बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही गाडी ४० किलो मीटर अंतरापर्यंत चालते. दरम्यान, एकदा बॅटरी चार्ज करण्यासाठी ३ युनिट वीजेचा वापर होतो. काही कर्मचारी आपली वाहने चार्जिंग करण्यासाठी सामान्य रूग्णालयाच्या वीजेचा वापर करतात. परिणामी, शासकीय रूग्णालयात दररोज १० ते १२ युनिट विजेचा अपव्यय होत असल्याची चर्चा आहे.
बाह्यरूग्ण विभागात वाहनांचा मुक्त प्रवेश!
सामान्य नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी तसेच उपचारासाठी सामान्यपणे बाह्यरूग्ण विभागाला प्राधान्य देतात. खामगाव येथेही बाह्यरूग्ण कार्यान्वित आहे. या विभागात चक्क रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक उभे असतानाच कर्मचारी आपली वाहने थेट औषध वाटप आणि नेत्ररोग विभागाच्या बाजूला असलेल्या पोर्चमध्ये आपली वाहने चार्जिंगसाठी नेत असल्याचे दिसून येते. गत अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.