डिसेंबर अखेरीस खामगाव पालिकेची ‘तिजोरी फुल्ल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:44 AM2018-01-01T01:44:16+5:302018-01-01T01:45:28+5:30

By the end of December, Khamgaon municipality's 'safe vile'! | डिसेंबर अखेरीस खामगाव पालिकेची ‘तिजोरी फुल्ल’!

डिसेंबर अखेरीस खामगाव पालिकेची ‘तिजोरी फुल्ल’!

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभर कर वसुली करून गाठले ४५ टक्के उद्दिष्ट!

अनिल गवई । 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सप्ताह आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवत, खामगाव पालिकेने कर वसुलीसाठी ‘वर्ष’भर काम करण्याचा उपक्रम राबविला. पालिकेच्या या उपक्रमाला खामगावकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी, वर्षाच्या अखेरीस पालिकेची ‘तिजोरी’ फुल्ल झाली असून, ३१ डिसेंबर रोजी एकूण उद्दिष्टाच्या ४५ टक्क्यांपर्यंतची वसुली खामगाव पालिकेने केली आहे.
सन २0१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ९  कोटी ६४ लाख 0६ हजार ९३0 रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना पालिकेचा अतिशय संथ गतीचा प्रवास राहिला. त्यामुळे  एप्रिल २0१७ ते ऑक्टोबर २0१७ या सात महिन्यांच्या कालावधीत  केवळ ७८ लाख ८८ हजार ७९८ रुपयांची वसुली पालिकेच्या कर विभागाने केली होती. नोव्हेंबरअखेरीस एकूण उद्दिष्टाच्या केवळ ९.२२ टक्के  वसुलीपर्यंत पालिका प्रशासन पोहोचले होते; मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून प्रशानाने वसुलीसाठी मोहीम उघडली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी रविवार असतानादेखील पालिका प्रशासनाने वसुलीसाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले. परिणामी, पालिकेच्या कर वसुलीत वाढ झाली. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या तीन-चार दिवसांमध्ये पालिकेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता एकूण उद्दिष्टापर्यंतच्या ४५ टक्क्यांपर्यंतच्या वसुलीकडे पालिका पोहोचली आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत पालिकेचा कर विभाग सुरू होता. त्यानंतर लगेचच नवीन वर्षाचा पहिला दिवस उजाडला. तोपर्यंत  २२ लाख, ४0 हजार ५४६ रु. कर वसुली पालिकेने केली होती.  दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत ४ कोटी ९ लाख ६७ हजार ६४४ रुपयांची कर वसुली पालिकेने केली आहे.

कर्मचार्‍यांनी केली मोहीम फत्ते!
४कर वसुलीसाठी अपेक्षित सहकार्य न करणार्‍या मालमत्ताधारकांना कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत पालिका कर्मचार्‍यांनी कर वसुली केली. यामध्ये गत आठवड्यात बुधवारपर्यंत ५0 लाख रुपयांची वसुली केली. त्यानंतर २८ डिसेंबर रोजी १0 लाख, २९ हजार १0९ रुपये, २९ डिसेंबर रोजी ११ लाख 0७ हजार ६७७ रुपये, तर डिसेंबर रोजी ३३ लाख १९ हजार २१९ रुपयांच्या कर वसुलीचा समावेश आहे.

नोटबंदीपेक्षाही अधिक प्रतिसाद!
अखेरच्या दोन दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात कर वसुली झाली. ही वसुली गेल्यावर्षी नोटबंदीच्या काळात झालेल्या वसुलीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षीच्या तुलनेत साडेतीन लाख रुपयांचा फरक असून, रविवारी रात्री पालिकेच्या तिजोरीत पैसे मावत नव्हते. म्हणजेच पालिकेत असलेली एकच तिजोरीही अपुरी पडत असल्याचे चित्र होते. कर विभागातील वरिष्ठ लिपिक रितेश तिवारी, दीपक कल्याणकर, श्याम मावळे, अनिल गोलाईत, अतिश गवई, उमेश अग्निहोत्री, माधव सदावर्ते, ऋषिकेश पवार, तर रोखपाल नरेंद्रसिंह चव्हाण, कृष्णाभाऊ भोकरे यांनी नवीन वर्षाच्या पहाटेपर्यंत कामकाज सुरळीत ठेवले.

धनादेशाद्वारे ६३ लाख रुपयांची वसुली!
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने धडक मोहीम हाती घेतल्यानंतर  १५ ते ३१ डिसेंबरच्या कालावधीत ६२ लाख ९७ हजार ४0५ रुपयांचे धनादेश पालिकेच्या कर विभागाला प्राप्त झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत धनादेशाद्वारे होणार्‍या वसुलीतही सकारात्मक वाढ झाल्याचे दिसून येते.

कर वसुलीच्या अपेक्षित उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना, ३१ डिसेंबर रोजी पालिकेचे कामकाज सुरू ठेवण्यात आले. पालिकेच्या या मोहिमेला रविवारी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर कर्मचार्‍यांचेही टीमवर्क अधिक चांगले राहिले. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीच्या टक्केवारीत वाढ करणे शक्य झाले.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव.
 

Web Title: By the end of December, Khamgaon municipality's 'safe vile'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.