चाचण्यांमधील चढउतारानंतरही सरासरी ८०७ जण होताहेत बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:44+5:302021-05-09T04:35:44+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात चढउतार झाले असले तरी जिल्ह्यात दररोज सरासरी ८०७ जण कोरोनाबाधित ...
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात चढउतार झाले असले तरी जिल्ह्यात दररोज सरासरी ८०७ जण कोरोनाबाधित आढळून येत असल्याचे एकंदरीत चित्र असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांवर कायम आहे. ३ व ४ मे रोजी कोरोना चाचण्यांची संख्या घटल्यानंतरही या दोन्ही दिवसांचा पॉझिटिव्हिटी रेट हा अनुक्रमे ३४ आणि २४ टक्के राहिला आहे. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दुसरीकडे ५ मेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील चार लाख ६३ हजार ५१ संदिग्धांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची वर्तमान स्थितीतील लोकसंख्या ही २९ लाख ६४ हजार २२० आहे. त्याच्याशी तुलना करता गेल्या १३ महिन्यात जिल्ह्यातील १६ टक्के नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांवर कायम आहे. जो की डिसेंबर २०२० दरम्यान ११ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला होता. परिणामी वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करण्याची अवश्यकता आहे. त्यातच जिल्ह्याचे कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३५.३ दिवसांवर आले. गेल्या वर्षी हे प्रमाण ८७ दिवसांच्या आसपास होते. त्यानंतर ते ६६ दिवसांवर आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बाधितांची संख्या मात्र जिल्ह्यात कमी होत आहे, ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
-ग्रामीण भागात चाचण्या कमी
एका अंदाजानुसार जिल्ह्यातील शहरी भागात जवळपास ५५ टक्क्यांच्या आसपास रुग्ण सापडून येत असले तरी ग्रामीण भागातही हे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. नाही म्हणायला आता आरोग्य विभागाने ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांसाठी गावातच थेट शिबिर घेण्यास प्रारंभ केला आहे. मात्र त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. तपासणी झालेले अहवाल त्वरित संबंधिताना मिळाल्यास उपाययोजना होऊन कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत होईल.
-रॅपिड टेस्टवर जोर
गेल्या १३ महिन्यात जिल्ह्यातील चार लाख ६३ हजार ५१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ५२ टक्के चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किटचा वापर करण्यात आला तर आरटीपीसीआरद्वारे ४५ टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटद्वारे अवघ्या तीन टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.