अर्ध्या पावसाळ्यानंतरही प्रकल्पांमध्ये ३९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:54+5:302021-07-30T04:35:54+5:30

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ...

Even after half of the monsoon, only 39 per cent water is stored in the projects | अर्ध्या पावसाळ्यानंतरही प्रकल्पांमध्ये ३९ टक्केच जलसाठा

अर्ध्या पावसाळ्यानंतरही प्रकल्पांमध्ये ३९ टक्केच जलसाठा

Next

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ही ५३३ द.ल.घ.मी. आहे. त्यापैकी वर्तमान स्थितीत प्रकल्पांमध्ये २०६.७० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. यापैकी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. असून त्याची टक्केवारी ही अवघी २१ टक्के आहे. मध्यम प्रकल्प असलेला कोराडी हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे. या प्रकल्पातून सध्या ३.०९ क्युसेकने अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

- मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्के जलसाठा

नळगंगा, पेनटाकाळी आणि खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्केच जलसाठा आहे. यापैकी खडकपूर्णा प्रकल्पामध्ये तर अवघा १२.१० टक्के जलसाठा आहे. पैनगंगा नदीचा पूर गेल्यामुळे पेनटाकाळी प्रकल्पात सध्या ३३ टक्के जलसाठा आहे.

- मध्यम प्रकल्पात ६८ टक्के पाणी

जिल्ह्यातील पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या सात प्रकल्पांमध्ये ६८.४८ टक्के जलसाठा आहे. प्रामुख्याने कोराडी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. उतावळी प्रकल्पातही ८७ टक्के, तर ज्ञानगंगा प्रकल्पात ७३ टक्के, मन प्रकल्पात ६६ टक्के आणि मस प्रकल्पामध्ये ५१ टक्के जलसाठा आहे.

- लघू प्रकल्पात ६३ द.ल.घ.मी. जलसाठा

जिल्ह्यातील ८१ लघू प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १७४.७६ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पांमध्ये अद्याप निम्माही पाणीसाठा नाही. अवघा ६२.८५ द.ल.घ.मी. जलसाठा यामध्ये आहे. त्याची टक्केवारी ही ३६ टक्के आहे. प्रामुख्याने या प्रकल्पांवरूनच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे प्रकल्प येत्या काळात भरणे गरजेचे आहे.

- रब्बी सिंचनाचा प्रश्न

पावसाळ्याच्या दोन महिन्यांनंतरही जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही ६१ टक्के रिकामे आहेत. जुलै महिन्यातील प्रकल्पांची पाणी पातळी निश्चित मर्यादेत ठेवावी लागत असली तरी, मुळात प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पाणी आरक्षणाचा प्रश्न, अशीच स्थिती येत्या काळात राहिली, तर उद्भवू शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पाणी आरक्षणासंदर्भातील बैठक होईल.

- पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २०० गावे, ११ पालिका व दोन नगरपंचायतींसाठी दरवर्षी साधारणत: ४० द.ल.घ.मी. पाणी हे पिण्यासाठी आरक्षित केले जाते. प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. वर्तमान स्थितीत आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे.

Web Title: Even after half of the monsoon, only 39 per cent water is stored in the projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.