अनलाॅक प्रक्रियेतही ग्रामीण भागात बसची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:17+5:302021-06-23T04:23:17+5:30
साखरखेर्डा : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना अजूनही ...
साखरखेर्डा : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना अजूनही बसची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागताे़ याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे़
मेहकर येथून साखरखेर्डा गावाचे अंतर २२ किमी असून चिखली शहरापासून ३३ किमी आहे . साखरखेर्डा गावाची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास असून या गावाला ३५ खेडे संलग्न आहेत. सवडद , मोहाडी , राताळी , शिंदी , पिंपळगांव सोनारा , दरेगाव , गुंज , गोरेगाव , उमनगाव , काटेपांग्री , सायाळा , वडगाव माळी , हनवतखेड , हिवरागडलिंग , सायाळा , देऊळगाव कोळ , कोनाटी , ही खेडी लव्हाळा ते साखरखेर्डा, दुसरबीड रोडच्या ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहेत. या खेड्यातून प्रवाशांना इतर ठिकाणी जायचे असेल तर लव्हाळा , साखरखेर्डा , शेंदुर्जन , मलकापूर पांग्रा येथे यावे लागते. त्यासाठी ऑटाे चालकाला किंवा काळी पिवळी चालकाला जादा भाडे द्यावे लागते . कोरोना संसर्गजन्य आजार आटोक्यात आला असतांना आज मेहकर ते औरंगाबाद ही सकाळी जाणारी बस सुरु झाली. परंतु मलकापूर ते वझरसरकटे , खामगाव ते जालना , मेहकर ते जालना , परतूर ते शेगाव , अकोला ते किनगावजट्टू , खामगाव ते लोणार , बुलडाणा ते भुमराळा , या बसेस अद्याप सुरु झाल्या नाहीत. मेहकर , चिखली , बुलडाणा , खामगाव येथे जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी बस नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे . याची दखल घेऊन जिल्हा आगार व्यवस्थापक यांनी साखरखेर्डा , शेंदुर्जन , मलकापूर पांग्रा या रोडने धावणाऱ्या बसेस सुरु कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख , माजी सभापती राजू ठोके , माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी उपसरपंच अस्लम अंजुम, राजू डुकरे, प्रवासी संघटनेचे सय्यद रफीक यांनी केली आहे़
प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे . या बाबींची दखल घेऊन मेहकर आगार प्रमुखांनी वडगाव माळी मार्ग साखरखेर्डा, मेहकर ते दरेगाव, मेहकर ते साखरखेर्डा मार्ग जालना , सायाळा मार्ग साखरखेर्डा बसेस सुरु कराव्यात. चिखली आगार प्रमुखांनी चिखली ते साखरखेर्डा मार्ग राताळी बस सुरु करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.