प्रत्येक चांगला व्यक्ती हा साध्या वेषातील पोलिसच! - हेमराजसिंह राजपूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:00 PM2019-06-01T18:00:15+5:302019-06-01T18:02:14+5:30
कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याची काळजी घेणारा प्रत्येक जण साध्या वेषातील पोलिस आहे.
- अनिल गवई
खामगाव : समाजातील प्रत्येकानं कायद्याचे पालन करण्याची सुरूवात स्वत:पासून करावी. कायद्याविषयी आदर आणि इतरांना त्रास होणार नाही, अशी प्रत्येकाची भावना असली की, सृजनशील समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागत नाही. नागरिकांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळं पोलिसांनाही कायदा आणि सुव्यवस्था राखणं सोपं जाते आणि पर्यायाने याचा सकारात्मक फायदा समाजालाच होतो. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याशी साधलेला संवाद...
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत काय सांगाल?
- गुन्हेगारीवर नियत्रंणासाठी पोलिसांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. समाजातील जागरूक नागरिक म्हणून, एखाद्या गुन्ह्याविषयी तसेच गोपनिय माहिती सामान्य व्यक्ती पोलिसांना सांगू शकतात. समाजातील ( सामान्यांकडून )साध्या वेशातील पोलिसांकडून प्राप्त माहितीच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल! पोलिसांना संदेश देणाºयांचे नावाबाबत गुप्तता पाळली जाईल.
लग्नाच्या मिरवणुकीसाठी पोलिसांच्या परवानगी संदर्भात आपली भूमिका काय?
- लग्नाच्या वरातीत अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याचे प्रकार वाढीस लागलेत. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर लग्नाच्या मिरवणुकी काढल्या जातात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच कुठेही अनुचित प्रकार घडता कामा नये, यासाठी प्रशासकीय बाब म्हणून पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
पोलिसांकडून गुन्हे दाबल्या जातात का?
- निश्चितच नाही! पोलिस आपली ड्युटी चोख बजावतात. एखादी घटना अथवा प्रकार दाबल्याची तक्रार आल्यास वरिष्ठांच्या सूचनेवरून प्रामाणिक चौकशी केली जाते. खामगाव येथील एका प्रकरणाचीही नि:पक्ष चौकशी सुरू आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन होईल, असे कोणतेही कृत्य पोलिसांकडून होत नाही!
संवेदशील म्हणून खामगावची ओळख पुसण्यात यश येतंय का?.
- निश्चितच...पूर्वी खामगाव शहराची संवेदनशील शहर म्हणून ओळख होती. मात्र, गत काही वर्षांत पोलिस आणि नागरिकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे खामगाव शहराची शांतप्रीय शहर म्हणून ओळख निर्माण होतेय. ही आपल्या दृष्टीकोनातून सकारात्मक बाब असून, खामगाव शहराची शांततेकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. आगामी काळात खामगाव शहराच्या शांततेला कुणाचीही वाकडी नजर पडणार नाही, याची समाजातील प्रत्येक घटकाने खबरदारी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.