बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत कर्जमाफीचे अर्ज सादर न करू शकलेल्यांना पुन्हा एकदा अर्जभरण्याची संधी दिल्याने कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे. अर्ज सादर करण्यास १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार कर्जमफीचे अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून मोफत पुरविण्यातबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत: सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतो. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
एकरकमी कर्ज योजनेसाठी ३० जूनपर्यंत मुदत
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत अर्ज भरण्यासाठी १ मेची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकरकमी कर्ज असलेल्या शेतकºयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास ३० जुन २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.