बुलडाणा : दहावी व बारावीच्या परीक्षेत सहभागी सर्व खेळाडूंना वाढीव क्रीडा गुण सरसकट मिळणार असल्याचे प्रतिपादन विद्याधर महाले यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने ग्रीष्मकालीन विविध खेळांचे व व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन १५ ते ३0 एप्रिल या कालावधीत स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा नगरी येथे सुरू आहे. २५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सत्रामध्ये शिबिराला क्रीडामंत्र्यांचे स्वीय साहाय्यक महाले यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाले पुढे म्हणाले की, खेळामुळेच अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग शिकायला मिळतो. खेळामुळेच अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग शिकायला मिळतो, असे सांगत त्यांनी बुलडाणा शहरामधील सर्व पालकांनी त्यांच्या पाल्यांना खेळासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आभारसुद्धा व्यक्त केले. दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठीच वाढीव क्रीडा गुण आतापर्यंत देण्यात येत होते. हे वाढीव क्रीडा गुण यावर्षीपासून सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना सरसकट मिळणार आहे. वाढीव क्रीडा गुण सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना सरसकट देण्याबाबतचे आदेश लवकरच देण्यात येणार आहे, अशी त्यांनी ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना घोषणा केली. याप्रसंगी बुलडाणा शहरातील प्रसिद्ध सूरसंगम कलामंचद्वारा प्रशिक्षण शिबिरातील खेळाडू विद्यार्थ्यांंकरिता बहारदार संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नरेंद्रसिंह राजपूत, प्राची माळीवाले व सहकार्यांनी उत्कृष्ट संगीताने सर्व खेळाडू व बुलडाणा शहरातील पालकवर्ग यांना मंत्रमुग्ध केले.
विद्यार्थ्यांना सरसकट वाढीव क्रीडा गुण - महाले
By admin | Published: April 27, 2015 1:32 AM