लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्थानिक एमआयडीसीस्थित एका कपडा फॅक्टरीचे केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे. या पाण्याला दूर्गंधी असल्याने जनावरांनी पाणी पित नाहीत. तसेच पिके देखील धोक्यात आली असल्याने फॅक्टरीच्या या दुषित पाणी तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी चिखली व खंडाळा मकरध्वज शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत तहसीलदार येळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून फॅक्टरी मालकास उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत.चिखली एमआयडीसीमधील एका टेक्सटाईल कंपनीतून निघणारे केमीकलयुक्त घाण पाणी वायझडी धरणात सोडण्यात येत आहे. या दुषित पाण्याची प्रचंड दूर्गंधी सुटल्यामुळे जनावरे पाणी पीत नाहीत. यासह हे पाणी सुचेत उर्फ बबलू देशमुख, आशिष महाडीक यांच्या शेताजवळ व धरणाच्या ज्या ठीकाणी तुंबते त्या कट्ट्यामधील पाणी काळे पडले आहे व त्याची दुर्गंधी सुटली आहे. तेच पाणी देशमुख यांच्या विहिरीमध्ये येत असल्याने विहरीतील पाण्याचा सुध्दा वास येत असून नाल्याला लागून असलेल्या विहरीतील पाणी दुषीत होऊन वास मारत असल्याने मजुरांना शहरातून पाणी घेऊन प्यावे लागत आहे. या दुषीत पाण्याबाबत फॅक्टरीचे मालक व व्यवस्थापकांकडे शेतकऱ्यांनी धरणाच्या मुख्य ओढ्यात हे पाणी येऊ देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. परंतू, वारंवार सांगूनही यावर उपाय न झाल्याने आणि जनावरांच्या व माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तथापी हेच पाणी पिकाला देण्यात येत असल्याने जमिनीची पोत खराब होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. तसेच धरणाखाली पाणीपुरवठा विहिरी असल्याने भविष्यात हेच रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात वायझडी धरणामध्ये साठवले जाणार असल्याने याचा विपरीत परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत. यामुळे तातडीने पाहणी करून या रसायनयुक्त दूषित पाण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या, दूषित पाणी धरणाच्या मुख्य नाल्याच्या प्रवाहात सोडणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. याअनुषंगाने ६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार येळे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून कंपनीच्या मालकांना उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान कंपनीनेही याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे. ओढ्याने केमीकलचे पाणी आल्यास कारवाई करणार असल्याचे अश्वासन तहसीलदारांनी शेतकºयांना दिले आहे. यावेळी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, स्वाभिमानीचे नितिन राजपूत, मंडळ अधिकारी पाटील, तलाठी गिरी, शेजोळ, बबलू देशमुख, आशिष महाडीक, एकनाथ यादव, शे. जमील शे. अहमद, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 4:09 PM