बुलडाणा - बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. या भेंडवळीत नैसर्गिक प्रतिकांची घटमांडणी करुन देशाच्या आर्थिक व सर्व प्रकारच्या स्थितीविषयी भाष्य करण्यात आले आहे. यावर्षी पावसाळा सर्वसाधारण असून ही परिस्थिती मोघम सांगितलेली आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त असेल. देशाच्या आर्थिक तिजोरीत वाढ होईल. यंदा पाण्याची टंचाई राहणार नाही. देशाचा राजा कायम राहील. कुठलाही धोका नाही तर शत्रूपासून देश सुरक्षित असेल देशाचे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील, अशा प्रकारचे भाकीत वर्तविले गेले आहे. भाकीत ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. जून महिन्यात सार्वत्रिक पाऊस येणार नाही, तर सर्वत्र पेरणीही होणार नाही. जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल राहिलेली पेरणी शेतकरी आटोपेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात साधारण स्वरूपाचा पाऊस पडेल. ज्या भागात जास्त पाऊस तेथे जास्त शेती-पिके चांगली येतील तर ज्या भागात कमी पाऊस तेथे पिक परिस्थिती साधारण राहील. असेही भाकीत वर्तवण्यात आले आहे. यापूर्वी हवामान खात्यानेही चांगला पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज वर्तवला होता.
ज्वारीचे भाव वाढतील, तूर पीक सर्व साधारण असेल त्याचे अमाप पीक येणार नाही. मुगाला काही काळासाठी चांगली तेजी येईल, तिळाचे पीक सर्वसाधारण राहील. बाजरीचे पीक साधारण असेल. जवस, वाटाण्याचे पीक हे देखील सर्वसाधारण राहील. युद्धाचे संकेत नसून संरक्षण खाते मजबूत स्थितीत असेल, अशी माहिती भेंडवळीच्या भविष्यवाणीत सांगण्यात आली.
अक्षय्य तृतीयेला करण्यात आली घटमांडणी
बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी 18 एप्रिलला अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी केली. 300 वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली आणि ती परंपरा या वाघ कुटुंबीयांनी आजही जपली आहे.
या विधीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व आपल्या सहकार्यासह येऊन चंद्रभान महाराजांचा जयजयकार करत घटमांडणी करतात. घटमांडणीनंतर रात्रभर त्या परिसरात कुणीही फिरकत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या समयी घटामध्ये नैसर्गिकरित्या जो काही बदल घडून येतात त्याबाबत दुसर्या दिवशी उपस्थित हजारो शेतकर्यांच्या समक्ष येणार्या हंगामाचे पिकपाण्याचे तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहुल देणारे भाकित वर्तवण्यात येते.
यावरून यंदा देशाचा राजा बदलतो काय? की तोच कायम राहणार, पृथ्वीवर काही नैसर्गिक अरीष्ट कोसळेल काय, अवकाळी पावसाची शक्यता, गुराढोरांना चारा आणि पिण्यासाठी पाणी असेल काय, त्याचबरोबर पिकांचे उत्पन्न आणि धान्याच्या भावामधील तेजीमंदीचा उलगडा होणार आहे का?. तेव्हा यंदाच्या भाकिताविषयी कमालीची उत्सुकता शेतकर्यांमध्ये दिसते. ही मांडणी पाहण्यासाठी व भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरात फार मोठा शेतकरी वर्ग याठिकाणी जमतो.
अशी करण्यात आली घटमांडणी
अक्षय्य तृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करत नियोजित शेताच्या ठिकाणी आले. त्याठिकाणी मातीचे गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करण्यात आला. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळे ठेऊन त्यावर घागर ठेवण्यात आली. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतिकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली गेली. तर खड्डयात घागरीच्या बाजूला राजा व त्याची गादी म्हणजे पान सुपारी ठेवली गेली. तर मातीच्या घटामध्ये गोलाकार पद्धतीनं अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपासी, हिवाळी मूग, उडिद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी 18 प्रकारच्या धान्यांची मांडणी करण्यात आली. या सर्व धान्य आणि खाद्य पदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसर्या दिवशी पहाटे अतिशय सूक्ष्म पद्धतीनं अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकिते वर्तवली जाते. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरवतो.