५० पेक्षा अधिक वर्षांपासून होता प्रलंबित : शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे मिळाले यश
मेहकरः गेल्या ५० पेक्षा अधिक वर्षांपासून रखडत पडलेल्या शेतरस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. खंडाळा येथील शेतकऱ्यांनी एकजुटीने आपसातील वाद आपसातच सोडवून शेतरस्त्याच्या कामासाठी लोकवर्गणी केली तसेच काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
खंडाळा शिवारातील हा शेतरस्ता अनेक वर्षांपासून खितपत पडला होता. या रस्त्यावर नेहमी वाद होत असत. पावसाळ्यातील चार महिने तर हा रस्ता बंदच राहत असे. या रस्त्याने गुरांना जाण्यासाठी, शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असे. यामुळे खंडाळ्याचे सरपंच रतन मानघाले यांनी सर्व शेतकऱ्यांची वारंवार बैठक घेऊन त्यांना समजावून सांगितले. महसूलचे वरिष्ठ अधिकारी, मंडळ अधिकारी चनखोरे, तलाठी विजय गारोळे, सरपंच रतन मानघाले, उपसरपंच विजय वायाळ यांनी शेतकऱ्यांमधील वाद आपसात समन्वय साधून सोडविला. हा शेतरस्ता २़३ किलोमीटर लांबीचा तर जवळपास १५ फूट रुंदीचा तयार होत आहे. या शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, यावेळी मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या हस्ते शेतरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली़ यावेळी सरपंच रतन पाटील मानघाले यांचे गावकऱ्यांनी आभार मानले़
काेट
शेतकऱ्यांनी आपापसातील वाद सामोपचाराने सोडविल्याने आम्हाला शेतरस्त्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले. यासाठी शेतकरी व महसूल प्रशासनाचे सहकार्य लाभले.
रतन पाटील, सरपंच, खंडाळा.
दळणवळणाकरिता शेतरस्ते महत्त्वाचे आहेत. याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील शेतरस्त्याचे काम आपसातील वाद सोडवून स्वतः पुढे येऊन करावे. अडचण असल्यास महसूल विभाग नक्कीच मदत करेल.
गणेश राठोड, उपविभागीय अधिकारी, मेहकर.