लोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड : सोनाळा येथील शेतकऱ्याने गंगाफळ पिकाला योग्य भाव व कोणी खरेदीदार नसल्यामुळे उभ्या पिकावर २ जुलै रोजी ट्रॅक्टर फिरवला आहे. देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाने आठवडी बाजारावर बंदी आणली. त्यामुळे शेतमाल बेभाव झाला. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी वासुदेव रामभाऊ झाल्टे, यांची वारखेड शिवारात गट नंबर ११० मध्ये तीन एकर बागायती शेती आहे. त्यांनी त्यातील दोन एकरात ५ मार्च रोजी गंगाफळ पिकाची पेरणी केली. वेळेवर पिकाला पाणी, निंदण, खत, महागडे कीटक नाशकाची फवारणी केली. त्यातही गंगाफळ पिकाला दर्जेदार फळ धारणा झालीच नाही, तसेच त्यातील काही लहान फळ कोमजून वाळू लागली. दोन एकरातील गंगाफळ पिकाला एकूण तीस हजार रुपये खर्च आल्याची माहिती वासुदेव झाल्टे यांनी दिली. या बिकट परिस्थितीमुळे गंगाफळ पिकाला लागलेला खर्चही निघाला नाही. पुढे पावसाचे दिवस असल्याने दुसरे पीक घेण्यासाठी गंगाफळ पिकावर ट्रॅक्टर फिरवून शेत काळेभोर केले, तसेच गत वीस दिवसांपासून संग्रामपूर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाचे मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन कापूस ही पिकेही धोक्यात आली आहेत.
शेतकऱ्याने गंगाफळ पिकावरही फिरवला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 11:56 AM