संग्रामपूर (बुलढाणा) : पाच पटीने रक्कम देण्याची आमिष दाखवून २५ लाख रुपये घेऊन पसार झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील दोन आरोपींच्या मुसक्या सोलापूर पोलिसांनी आवळल्या. यात संग्रामपूर तालुक्यातील दाेन आरोपींचा सहभाग असून एक आरोपी पुणे जिल्ह्यातील आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मेडद येथील एका शेतकऱ्याला चालू चलनातील २५ लाखांच्या नोटांच्या मोबदल्यात पाच पटीने दाेन हजार रुपये दराच्या सव्वा कोटी रुपये किमतीच्या नोटा देण्याचे आमिष आरोपींनी दिले होते. हा व्यवहार शनिवारी दुपारी तीन वाजता दरम्यान शेतकऱ्याच्या मामाच्या घरी मौजे भांबुर्डी (खोरेवस्ती), ता. माळशिरस येथे झाला.
आरोपींनी शेतकऱ्याकडून २५ लाखांची रक्कम घेतली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने माळशिरस पोलिस ठाणे गाठले. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील आरोपी नवनाथ उर्फ नाथा व त्याचे दोन अनोळखी साथीदाराविरुद्ध फिर्याद दिली. शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून माळशिरस पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या शोधात एक पथक रविवारी संग्रामपूर तालुक्यात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तामगाव पोलिस ठाणे हद्दीतील धामणगाव येथील शेख शकील या आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून आठ लाख रुपयांची रक्कम जप्त केली.
तसेच सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील टुनकी येथील शिवाजी लोणकर, त्याच्यासोबत असलेला वाघोली येथील आरोपी नवनाथ उर्फ नाथा या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १६ लाख रुपये असे एकूण २४ लाख रुपयांची रक्कम जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिघांना ताब्यात घेऊन पथक रवाना झाले. तामगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. ही कारवाई माळशिरस पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक एम.एम. पुजारी, पोलिस नाईक दत्ता खरात, वाघ यांनी केली. त्यांना तामगाव पोलिस ठाण्यातील प्रमोद मुळे, आर.बी. माळी यांनी सहकार्य केले.
असा आहे घटनाक्रम१५ जुलै रोजी माळशिरस तालुक्यातील मेडद येथील नामदेव जयराम वळकुंदे या शेतकऱ्याला आरोपी नवनाथ उर्फ नाथा याने दोन हजार रुपये दराच्या सव्वा कोटी रुपये किमतीच्या नोटा आहेत. चालू चलनातील २५ लाख रुपये दिल्यास दाेन हजार दराच्या सव्वा कोटी रुपयांच्या नोटा देऊ, असे सांगितले. रक्कम मिळाल्यानंतर काहीच न देता आरोपी पसार झाले.