लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/खामगाव : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकर्यांनी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या ग्राम रौंदळा येथे वाढता कर्जाचा डोंगर आणि सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली. रौंदळा येथील संतोष ओंकार मोकळकार यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी सेवा सहकारी सोसायटी रौंदळा येथून ३५ हजार ४00 रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत संतोष मोकळकार यांनी २३ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सुरेश मोकळकार यांनी तेल्हारा पोलिसांत वरील घटनेविषयी फिर्याद दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पंचनामा झाल्यावर मृतदेह तेल्हार्याच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.तर दुसर्या घटनेत, खामगाव तालुक्यातील शिलोडी येथील दिनेश रामदास बाभुळकर या शेतकर्याने २२ जून रोजी गावानजिकच्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरीत पाणी असल्यामुळे दिनेश बाभुळकर गंभीर जखमी झाला. हा प्रकार तेथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्याला खासगी दवाखान्यात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी शुक्रवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतक दिनेश याच्याकडे गतवर्षीचे कर्ज थकीत होते. यावर्षी पेरणीची आर्थिक तजवीज व्हावी म्हणून तो बँकेकडे कर्ज मिळण्यासाठी चकरा मारत होता. मात्र कर्ज न मिळाल्याने आलेल्या वैफल्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मृतकाच्या कुटुंबियांनी दिली.
अकोला, खामगावात शेतकरी आत्महत्या
By admin | Published: June 24, 2017 4:40 AM