लोणार तालुक्यात पेरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 01:25 PM2019-06-30T13:25:37+5:302019-06-30T13:26:06+5:30
लोणार: लोणार तालुक्यामध्ये दमदार पावसानंतर पेरणीची लगबग सुरू झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: लोणार तालुक्यामध्ये दमदार पावसानंतर पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसापासून दररोज झालेल्या संततधार पावसाने शेतकरी सुखावला आहे.
मृग नक्षत्र पुर्णता कोरडा गेल्यानंतरही तालुक्यात पावसाचा पत्ता नव्हता. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, २६ जूनला मध्यरात्रीला दमदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसात तालुक्यात चांगला पाऊस झाला. २६ जूनला शाळेला सुरुवात झाली, परंतू त्याचदिवशी सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने विद्यार्थ्यांना काही ठिकाणी शाळेत जाण्यासाठी त्रास सोसावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एसटी बस सुद्धा रस्त्यावरील चिखलामुळे काही ठिकाणी बंद होती. रस्त्याच्या काही भागामध्ये पाणी तुंबून राहिले होते. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी व शुक्रवारी दिवसभर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली आहे. सध्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना शेतकरी दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेत काही ठिकाणी चिखल झाला होता. शहरातील सांडपाण्याच्या नाल्यामधील पाणी रस्त्यावरून वाहत होते. काही जलाशये, तलावांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. लोणार तालुक्यात बुधवारला ९ मि.मी. पाऊस झाला. तर गुरुवारी ५० मि.मी., शुक्रवारी दोन मि. मी. व शनिवारला आठ मि. मी. पाऊस झाला आहे. तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसासह वादळी वाराही आहे. त्यामुळे काही ठिकाणी विद्युततारांवर झाडाच्या फांद्या कोसळून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे. नदी, नाले, प्रवाहित होत आहेत. (शहर प्रतिनिधी)