जळगाव जामोद : गेल्या पाच वर्षात भाजपा शासनाने महाराष्ट्रात जेवढे शासकीय दवाखाने, शाळा उघडल्या नसतील त्यापेक्षा जास्त पक्षाची कार्यालये उघडली. हे सरकार घोटाळेबाज असून यांनी महाराष्ट्रात ६० हजार कोटी रूपयांचा किसान विमा घोटाळा केला. विम्याचे नावावर एवढा प्रचंड पैसा शेतक-यांजवळून जमा केला तर केवळ ९ हजार कोटी विमा वाटला तर इतर पैसा गेला कोठे? असा सवाल काँग्रेसचे युवा नेते, हार्दिक पटेल यांनी केला. जळगाव जामोद येथे ५ सप्टेंबर रोजी भा.रा.काँ., रा.काँ., स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षाचेवतीने आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी रामविजय बुरूंगले, रा.काँ. सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्यासह काँग्रेसचे प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ, स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रंगराव देशमुख, डॉ.दलाल, मिना सातव तथा मतदार संघातील मान्यवरांची उपस्थिती होती. गेल्या पाच वर्षात देशात ७० हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात यांनी शेतक-यांना बरबाद केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपविण्याचा घट घालणा-या या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही पटेल यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी इतर युवा नेत्यांची सुद्धा भाषणे झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जातीपेक्षा विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतक-यांच्या तुरीचे हरभºयाचे अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. सभेला प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ यांचीही समयोचित भाषणे झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.