ऑनलाइन नोंदणीनंतरही शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 02:53 PM2020-01-19T14:53:24+5:302020-01-19T14:54:55+5:30
तूरीला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी आॅनलाइन नोंदणीच्या मागे लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आली आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तूर खरेदीची प्रतीक्षा लागली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, नाफेड अंतर्गत किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात येते. तूरीच्या खरेदीसाठी ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव ठरवून देण्यात आले आहेत. आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी १ जानेवारीपासून आॅनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे. गेल्या १८ दिवसांमध्ये नोंदणी केलेल्या शेतकºयांची नवीन तूर आता बाजारत आली आहे. परंतू नाफेडची खरेदी आतापर्यंत सुरू झालेली नाही. शेतकºयांची ज्या तालुक्यात जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर त्यांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत, तूर पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड संलग्न असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, तलाठ्याचे पीक पेरा पत्र आदी कागदपत्र सादर करावे लागतात. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येते. यंदा खरीप हंगामात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. तूर पिकाला सुद्धा फटका बसला. अतिपावसाच्या या संकटातून वाचलेल्या तूरीचा हंगाम आता अंतीम टप्प्यात आहे. अनेकांची तुरीची काढणी पूर्ण झाली आहे. नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीची अंतीम मुदत देण्यात आली आहे. तूरही शेतातून घरात आली आहे. तूरीला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी आॅनलाइन नोंदणीच्या मागे लागले आहेत.
लवकरच होणार खरेदीला सुरूवात
नाफेडकडे तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. मात्र त्याला अपेक्षीत प्रतिसाद यंदा मिळत नाही. आतापर्यंत झालेल्या नोंदणीदार शेतकºयांसाठी लवकरच नाफेडकडून तूर खरेदी सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मागील वर्षीची चुकारेही देण्यात आले असून, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुदतीमध्ये शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन नाफेडकडून करण्यात आले आहे.
तूरीला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव
तूर पिकाचा हमीभाव ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. परंतू सध्या नाफेडकडून हमीभावाने तूर खेरीद सुरू झालेली नाही. त्यामुळे तूरीला व्यापाºयांकडून सरासरी ४ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे क्विंटलमागे एक ते दीड हजार रुपयांचा फटका तूर उत्पादक शेतकºयांना बसत आहे.
नोंदणीसाठी कागदपत्रांची जुळवा-जुळव
हमीभावाने तूर खरेदीसाठी १५ फेब्रुवारीची अंतीम मुदत देण्यात आली आहे. या महिन्याभरामध्ये सातबारावर पिकाची नोंद, तलाठ्याकडून पीक पेरा पत्र, बँक खात्याला आधार कार्ड संलग्न आदी कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यात येत आहे. परंतू अनेकवेळा तलाठीच हजार राहत नसल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे.