लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीसाठी दरमहा ५० बॅगची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता एका शेतकऱ्याच्या नावे फक्त ५० बॅग खत दर महिन्याला खरेदी करता येणार आहे. म्हणजे साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खत शेतकऱ्याला खरेदी करता येणार आहे. केंद्र शासनाच्या रसायन व उर्वरक मंत्रालयाचे डीबीटी संचालक निरंजन लाल यांनी २१ जानेवारी रोजी कृषी यंत्रणेला पत्राद्वारे सूचित केले आहे.यापूर्वी शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर खत खरेदी व्हायचे; मात्र दोनपेक्षा जास्त सदस्यांच्या नावावर शेती असायची. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात खते खरेदी केल्याचे दिसत होते. खतांची खरेदी अमर्यादित केली जायची. आता आधार कार्डनुसार एका शेतकऱ्याला केवळ ५० बॅग खताची खरेदी महिन्याला करता येणार आहे. त्यामुळे किती शेतकऱ्यांना किती खत विकण्यात आले, किती शेतकऱ्यांनी खत खरेदी केले, याची माहिती संकलित होण्यासही मदत होणार आहे. या निर्णयामुळे खतांची खरेदी-विक्री ऑन रेकॉर्डवर दिसणार आहे. त्याचबरोबर खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा अंगठा पॉस मशीनवर लावून विक्री होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांवरील कारवाई टळणार आहे.
शेतकऱ्यांना महिन्याला ५० बॅगच खत खरेदी करता येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 11:58 AM