बुलढाणा : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत बुधवार ५ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्ह्यातील आरटीईच्या प्रवेशासाठी दोन हजार २४६ विद्यार्थ्यांचे लॉटरीच्या माध्यमातून भाग्य खुलणार आहे. या ऑनलाईन प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सात हजारावर पालकांना उत्सुकता लागली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२७ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २ हजार २४६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे.या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही. सी. द्वारे करण्यात येणार आहे. पालकांनी स्वतः या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सुविधा देण्यात आली आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडतीची जिल्ह्यातील ७ हजार ५४ पालकांना प्रतीक्षा लागलेली होती. दरम्यान, आता ऑनलाइन सोडतला मुहूर्त मिळाल्याने आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला आता वेग येणार आहे.