शौचालयाच्या टाक्यातील मोबाइल काढणे बेतले बापलेकाच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:09 PM2020-06-22T13:09:16+5:302020-06-22T18:53:25+5:30
पिता-पुत्र शौचालयाच्या टाक्यात जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना निमगाव येथे घडली आहे
नांदुरा : शौचालयात पडलेला मोबाइल काढण्याच्या प्रयत्नात वडिल व मुलगा टाक्यात पडल्याने त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील निमगाव ते निमगाव फाटा रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. जेसीबीच्या साह्याने दोघांनाही टाक्यातून बाहेर काढत नांदुरा येथे उपचारासाठी आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
गावातील मधुकर नारायण टवलारकर (वय-५५) त्यांचा मुलगा बंटी उर्फ अनिकेत (वय-२५) हे दोघेही शौचालयाच्या खड्ड्यात पडले होते. बंटीचा मोबाइल पडल्याने तो काढण्याचा प्रयत्न ते करत होते. मात्र, मधुकर यांचा पाय घसरल्याने ते शौचालयाच्या खड्ड्यात पडले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बंटीही खड्ड्यात पडला. यावेळी उपस्थितांना आरडाओरड केली. नांदुरा येथील नंदू जुमडे यांची जेसीबी त्याचवेळी तेथून जात होती. चालक राहुल जुमडे यांनी शौचालयाच्या बाजूचा भाग खोदून ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. मधुकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बंटीला नांदुरा येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. बंटी हा पुणे येथील कंपनीत वेल्डरचे काम करीत होता. लॉकडाऊनमुळे तो गावात आला होता. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबातील लहान मुलीचे लग्नही झाले आहे.
मोबाइलच्या मोहापायी झाला घात
बंटीने सतरा हजाराचा अँड्रॉइड मोबाइल घेतला होता. तोच शौचालयात पडला होता. सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने एवढा महागडा मोबाइल पडल्याचे शल्य सर्वांनाच होते. त्यामुळे तो काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला व घात झाला .