तिसऱ्या लाटेची भीती, बुस्टर डोसबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:27+5:302021-09-14T04:40:27+5:30
बुलडाणा: कोरोना प्रतिबंधक लस घेऊन अनेकांना सहा महिने झाले आहेत. त्यामुळे या लसींची परिणामकारकता किती काळ टिकते, लसींचा प्रभाव ...
बुलडाणा: कोरोना प्रतिबंधक लस घेऊन अनेकांना सहा महिने झाले आहेत. त्यामुळे या लसींची परिणामकारकता किती काळ टिकते, लसींचा प्रभाव कालांतराने क्षीण होत तर नाही ना? असे अनेक संभ्रम निर्माण करणारे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. तिसऱ्या लाटेची साशंकता व्यक्त करण्यात आल्याने खरेच बुस्टर डाेसची आवश्यकता आहे का? याबाबत जिल्हा स्तरावर आरोग्य विभागाकडून स्पष्टता करण्यात आली नाही. त्यामुळे याबाबत संभ्रम वाढला आहे. कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक जण आता लसीकरणासाठी पुढे येत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे, अशा लोकांमध्ये लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात प्रतिकारशक्ती चांगली होती; मात्र कालौघात ही प्रतिकारशक्ती कमी झाली. दरम्यानच्या काळात डेल्टा हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला होता. लसीचे दोन्ही डोस झालेले दुसऱ्या लाटेत कोरोनाला फाईट देऊ शकले; परंतु ठरावीक कालावधीनंतर लसींचा प्रभाव कितपत टिकतो, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
बुस्टर डाेसबाबत सूचना नाही
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्यांमध्ये 'ॲन्टीबॉडीज' चांगल्या आहेत. कालौघात प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो; पण जास्त नाही. सध्या बुस्टर डोसबाबत कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांनी तातडीने लस घेणेच महत्त्वाचे आहे.
डॉ. राजेंद्र सांगळे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी.
असे झाले लसीकरण
जानेवारी २१३०
फेब्रुवारी ३७३९
मार्च ३१२५४
एप्रिल ३८५८९
मे ३४४८७
जून ३०६८०
जुलै ४२५५०
ऑगस्ट ८८६८६
एकूण लसीकरण : ११६७४२९
पहिला डोस: ८४३०३३
दुसरा डोस: ३२४३९६
फ्रन्टलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक अधिक
कोरोना लसीचे दोन्ही डाेस घेऊन सहा महिने झालेल्यांमध्ये फ्रन्टलाइन वर्कर्सच अधिक आहेत. त्या पाठोपाठ ६० वर्ष वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आता फ्रन्टलाइन वर्कर्स व ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीचा प्रभाव कितपत आहे, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
लसीचे कवच किती काळ?
लसीचा प्रभाव हळूहळू क्षीण होत जातो, याबाबत शास्त्रज्ञांनी मागील महिन्यात निष्कर्ष काढले होते. आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीचे कवच किती काळ? याची चर्चा सुरुवातीच्या काळात दोन्ही डोस झालेल्यांमध्ये होत आहे.