जिल्हाभरात सध्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले आहे. त्यात अंगावर पुरळ येणे व ताप असे रुग्णही आढळून येत आहेत. नागरिकांनी योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
असे केले जाते निदान
ताप व अंगावर पुरळ आलेले रुग्ण शासकीय यंत्रणेत दाखल झाल्यानंतर या रुग्णाचे नमुने घेतले जातात. खासगी यंत्रणेत असे काही रुग्ण आहेत का? याची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाते. या रुग्णांचे हे संकलित केलेले नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवून त्यानंतर याचे निदान केले जाते.
९५ टक्के गोवर रुबेलाचे लसीकरण
२०१८ साली जिल्हाभरात गोवर-रुबेला लसीकरणासाठी एक विशेष मोहीम जिल्हा आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार १५ वर्षांपर्यंतच्या ९५ टक्के लाभार्थ्यांचे गोवर-रुबेला लसीकरण झाले आहे.
...तर डॉक्टरांना दाखवा
गोवर हा कुठल्याही वयोगटात होऊ शकतो. अशा स्थितीत ताप असणे व अंगावर पुरळ येणे हे गोवरचे लक्षण आहे. त्यामुळे अशा स्थितीत खासगी किंवा शासकीय डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
दक्षिण पूर्व आशिया विभागातील विविध देशांसह भारत सरकारने २०१३ पर्यंत गोवर आजाराचे दुरीकरण आणि रुबेला आजारावर नियंत्रण हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यानुसार लसीकरण, गोवर व रुबेला आजारांचे सर्वेक्षण याबाबत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत लहान बालकांना नऊ महिने पूर्ण झाल्यावर गोवर- रुबेलाचा पहिला डोस व १६ ते २४ महिन्यांदरम्यान दुसरा डोस देण्यात येत आहे.
-डॉ. रवींद्र गोफने, माता व बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा.