ग्रामीण भागात ‘डिजिटल इंडीया’चा बोजवारा; इंटरनेट सेवा वारंवार खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:37 PM2019-05-04T15:37:06+5:302019-05-04T15:37:24+5:30
संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.
संग्रामपूर तालुक्यात आठवड्यातून तीन ते चार दिवस इंटरनेट सेवा ठप्प होते. परीणामी आॅनलाईन कामकाजावर परिणाम होत आहे. बँकांचे व्यवहार बंद पडत आहेत. असे वारंवार होत असल्याने कॅशलेस व्यवहारांचा फुगाही फुटला आहे. संग्रामपूरसह वरवट बकाल, पातुर्डा, बावनबिर, सोनाळा येथे राष्ट्रीयकृत बँकांसह पतसंस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच आॅनलाईन कामकाजाकरीता महा ई सेवा केंद्र, सी. एस. सी. सेंटर कार्यान्वित आहेत. ह्या सर्व सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी इंटरनेट सेवा आणि तीही जलद गतीने सुरू राहण्याची गरज आहे; परंतु संग्रामपूर तालुक्यात असे होताना दिसत नाही. जलदगतीने इंटरनेट सेवा तर सोडाच, बीएसएनएल ब्रॉडब्रँडची सेवाही वारंवार विस्कळीत होते. सध्या गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वच आॅनलाईन व्यवहार बंद पडल्यागत झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून बँकेत इंटरनेट सेवा सुरळीत होण्याची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. सोनाळा येथील भारतीलय स्टेट बँकेत ग्राहक इंटरनेट सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. तासन्तास उभे राहूनदेखिल व्यवहार होत नसल्याचे चित्र आहे. अखेर संध्याकाळी काम न होताच परतावे लागत आहे. पुन्हा दुसºया दिवशीही तीच परिस्थिती ग्राहकांवर येत आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीत आॅनलाईन कामकाजांवर भर दिला. परंतु इंटरनेट सेवाच विस्कळीत राहत असल्याने शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे.
दर आठवड्यात केबल तुटल्याचे कारण पुढे करीत बीएसएनएलची इंटरनेट विस्कळीत राहत आहे. तालुक्यातील बावनबीर येथील बँक आॅफ महाराष्ट्र व सोनाळा येथील भारतीय स्टेट बँक शाखेत गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हीटी नाही. परिणामी येथील व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत.
वारंवार खंडीत होत असलेल्या ब्रॉडबँड सेवेबाबत जळगाव जामोद येथील बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. केबल तुटल्याचे कारण पुढे करीत इंटरनेट सेवा खंडीत करण्यात येत आहे, असा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकांचे व्यवहार वेळेवर होत नाहीत. इतर महत्त्वाची कामे सोडून दिवसभर बँकेत लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. आठवड्यातून किमान तीन तेच चार दिवस अशीच परिस्थिती असते. याविरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
- पांडुरंग वेरूळकार
शेतकरी, सोनाळा ता. संग्रामपूर
फायबर आॅप्टिक केबल तुटल्यामुळे ब्रॉडबँड सेवा विस्कळीत झाली आहे. जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच इंटरनेट सेवा सुरळीत होईल.
- राकेश मेहरा
कनिष्ठ अभियंता,
बी.एस.एन.एल. कार्यालय, जळगाव जामोद.