चिखलात पेरायचे तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:44 PM2019-11-27T15:44:28+5:302019-11-27T15:44:37+5:30
शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अतिवृष्टी संपूण २० दिवस होत आहे; परंतू अद्यापपर्यंत अनेक शेत चिखलमयच आहेत. शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाचा अहवालही जिल्ह्यात शुन्य टक्के पेरणी असल्याचे सांगतो. काही शेतामध्ये आजही चिखल असल्याने यात पेरावे तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
रब्बी पिकासाठी जिल्ह्यात हवामान पोषक राहत असल्याने गेल्या काही वर्षापासून रब्बीचे उत्पादन व क्षेत्रही वाढले आहे. यंदा खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामध्ये पैनंगगा नदीपात्राच्या परिसरातील काही शेतजमीनी तर पुर्णत: खरडून गेल्या. सध्या बहुतांश शेतजमीनी ह्या चिखलमय झालेल्या आहेत. शेतातील ओलावा जास्त असल्याने रब्बी पेरणीपूर्वी करावयाचे मशागतीच्या कामांनाही शेतकºयांना अडचणी येत आहेत.
ओल कमी होण्याची वाट बघावी लागते
दरवर्षी जमीनीत पुरेसा ओलावा राहत नव्हता. ओलाव्याअभावी पेरणी रखडत होती. परंतू यंदा जास्त ओलाव्यामुळे पेरणी करणे अवघड झाले आहे. अतिपावसामुळे शेतीची मशागत करण्यात अडचण येत आहे. -शत्रुघ्न देशमुख,शेतकरी,
ऊमरा दे. ता. मेहकर.
‘वापसा झाल्यावरच पेरणी करा’
सखल जमीनीमध्ये जास्त ओलावा आहे. अशा ठिकाणी वापसा झाल्यावरच शेतकºयांनी पेरणी करावी. रब्बी पेरणीसाठी जमीनीचा वरचा थर हा कोरडाच असावा.
- सी. पी. जायभाये,
कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.