खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे फायर ऑडीट पूर्णत्वास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:00 PM2021-02-01T23:00:00+5:302021-02-01T23:00:01+5:30
Fire Audit of Hospital मदतीला धावलेल्या ‘देवदूता’नेच रूग्णालयातील फायर आॅडीट आणि अद्ययावत यंत्रणेचा खर्च केला आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील फायर आॅडीट अखेरीस सामाजिक दातृत्वातून पूर्णत्वास नेण्यात आले. कोरोना संकट काळात उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या मदतीला धावलेल्या ‘देवदूता’नेच रूग्णालयातील फायर आॅडीट आणि अद्ययावत यंत्रणेचा खर्च केला आहे. मात्र, प्रसिध्दीपासून दूर राहण्यासाठी नामोल्लेख टाळण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे येथे उल्लेखनिय!
जानेवारी महिन्यात भंडारा येथील नवजात शिशू विभाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयातील फायर आॅडीटचा मुद्दा ऐरणीवर आला. दरम्यान, खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती येथून फायर आॅडीटकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने सामाजिक दातृत्वातून आलेल्या निधीतून फायर आॅडीट पूर्ण केले आहे. फायर आॅडीट दरम्यान, नवजात शिशू विभागातील उणिवा दूर करताना, खामगाव येथील रूग्णालयात दोन आपातकालीन दरवाजेही ताबडतोब बसविण्यात आले. यासाठी उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाकडून खर्च करण्यात आला.
‘देवदूत’ धावला नवजात शींशूच्या मदतीला!
- कोरोना संक्रमण कालावधीत खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात अत्याधुनिक कोरोना टेस्टींग लॅब उभारणीसाठी झटणाºया आणि लक्षावधी रूपयांची मदत करणाºया ‘देवदूता’च्या दातृत्वातूनच खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे फायर आॅडीट पूर्ण झाले. दातृत्वातून फायर आॅडीट पूर्णत्वास आलेले खामगाव येथील राज्यातील एकमेव रूग्णालय आहे.
२२ आॅटोमॅटीक अलार्मही बसविले!
-भंडारा येथील घटनेचा बोध घेत, राज्यातील विविध शासकीय रूग्णालयातील नवजात शिशू विभागातील यंत्रणेचा धांडोळा घेतला जात आहे. वार्मरमधील शॉर्ट सर्कीटमुळे ही दुर्देवी घटना घडल्यानंतर सर्वच शासकीय रूग्णालयांचे फायर आॅडीट करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात २२ आॅटोमॅटीक अलार्म बसविण्यात आले. तसेच एका ठिकाणी मॅन्युअली अलार्म यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली.
जानेवारी महिन्यात ६९ बालकांवर उपचार
- खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील इनबॉर्न विभागात ५ वार्मर आहेत. तर आऊट बॉर्न विभागात १२ वार्मर कार्यान्वित आहेत. इनबॉर्न आणि आॅऊटबॉर्न विभागात एकुण २६ नवजात शीशू रूग्ण ठेवण्याची क्षमता आहे. त्याचवेळी स्टेप डाऊन विभागात ४ वार्मर कार्यान्वित आहेत. जानेवारी महिन्यात या रूग्णालयात ६९ बालकांवर उपचार करण्यात आले.