बुलडाणा: शहरालगतच्या राजूर घाटात पुन्हा एकदा आगीचे तांडव २८ एप्रिल रोजी दिसून आले. यामध्ये प्रादेशिक वनविभागातंर्गत येत असलेली वनसंपदा नष्ट झाली आहे. दरम्यान, वनविभागाचे आग रोधक पथक मात्र उशिरार्पंत या ठिकाणी पोहोचले नव्हते.बुलडाणा शहरालगतच्या या भागात अलिकडील काळात सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. त्यात लोख रुपये किंमतीची वनसंपदा नष्ट होत आहे. मात्र वनविभागाकडून या वनसंपदेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच खडकी रस्त्या लगतच्या भागातही मधल्या काळात आग लागली होती. या भागात काही ठिकाणी दगडांच्या पाळा रचण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या भागात अतिक्रमण करण्यासाठीतर अशा आगीच्या घटना घडवल्या जात नसाव्यात ना अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात लागणार्या आगीकडे गांभिर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातही या भागात आग लागली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले होते. शहराचे वैभव असलेला आरटीओ आॅफीस जवळचा व्हीव्ह पॉईंट परिसरातही यापूर्वी आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने वनसंपदेच्या रक्षणाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.दुसरीकडे ज्ञानगंगा अभयारण्यातही गेल्या काही वर्षापासून सातत्याने आगीच्या घटना घडत असून येथील वनसंपदाही धोक्यात आली आहे. २००७ मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात मोठी आग लागली होती. त्यानंतर सातत्याने अलिकडील काळात या आगीच्या घटना घडत आहे. त्यातच वाढत्या तापमानाचाही फटका वनसंपदेला बसत असून त्यातून ही आग आणखी भडकत आहे. त्यामुळे जाळ रेषेची कामेही वन्यजीव तथा प्रादेशिक वनविभागात प्रभावी पणे केली जाण्याची गरज आहे.
सातपुडा परिसरात वणवा; लाखोंची वनसंपत्ती धोक्यात
जळगाव जामोद: : सातपुडा पर्वतातील निमखेडी बिटमध्ये २२ एप्रिल पासून राखीव वनात वणवा लागल्याने वनसंपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. अद्याप आग आटोक्यात आणण्यास वनविभागास अपयश आल्याचे दिसून येत आहे. २२ एप्रिल पासून राखीव जंगलात वणवा लागला असल्याने मोठयाप्रमाणात साग, धावडा, सालाई, अंजन इत्यादी बहुमोल विविध जैव वनस्पती वनव्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. याबाबत २७ एप्रिल रोजी वनपरिक्षेत्रअधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क केला असता, आग विझविण्यासाठी मजूर पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो रूपयांची वनसंपदा जळून खाक होत असल्याची भावना निमखेडी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून बिटमध्ये वन संरक्षण समित्यासुध्दा स्थापन करण्यात आल्या आहेत. नियमानुसार वनसंपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची व वनविभागाची आहे. परंतु सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने आगीत वनसंपदा भक्ष्यस्थानी पडत असल्याचे दिसून येत आहे. वन संरक्षण समितीला शासनाकडून निधीही मिळतो. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी ग्राम निमखेडी येथील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)