- अनिल उंबरकरलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : पंचायत समिती अंतर्गत सर्व शाळांची पहिली घंटा २६ जुन रोजी वाजणार आहे. चिमुकल्यांच्या किलबिलटाने शाळा उघडणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून विद्यार्थी तंबाखुमुक्तीची शपथ घेणार आहेत.उन्हाळ्याची सुटी संपायला अवघा ८ दिवसांचा कालावधी उरला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना देऊन शैक्षणिक सत्र २०१९-२०२० च्या सत्राला सुरूवात होणार आहे. जिल्हा परिषद, खाजगी व्यवस्थापन व नगर परिषदेच्या मराठी, उर्दू तसेच सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहचविण्यात आली आहेत. शाळांच्या पटसंख्येनुसार इयत्तानिहाय, विषयनिहाय पाठ्यपुस्तकांची विभागणी करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी पाठ्यपुस्तके गोणपाटामध्ये भरून तालुक्यातील प्रत्येक शाळेतमध्ये पोहचविण्यात आली आहेत. १८ जुन रोजी कठोरा व मनसगांव केंद्राचा शेवटचा टप्पा शिक्षण विभागाद्वारे पुर्ण करण्यात आला आहे.गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम फुसे, ज्ञानेश्वर घुले, पांडुरंग सुर्यवंशी, विनोद वैतकार, श्रीकांत सोनोने आदी कर्मचाºयांनी पाठ्यपुस्तके प्रत्येक शाळेत पोहचविली आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणून सामाजिक न्याय दिवस व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वितरित करून पाठ्यपुस्तक दिन साजरा करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये नविन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्त महाराष्ट्र घटविण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी ‘तंबाखूमुक्त जीवन’ संकल्प विद्यार्थी करणार आहेत. माझी शाळा, माझे कार्यालय, माझे गाव, माझे कुटुंब, माझे घर आणि माझा परिवार तंबाखू मुक्त करण्यासाठी विद्यार्थी शपथ घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी वर्षभर प्रयत्नशील राहणार आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी घेणार तंबाखु मुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:04 PM