लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सूर्यास्त ते सुर्योदयापर्यंत मासेमारीला पूर्णत: बंदी असतानाही रात्रीच्या वेळी कंडारी-भंडारी येथील तलावात मासेमारी केल्याप्रकरणी अखेर संबंधित संस्थेला नोटीस बजावण्यात आली. ‘कंडारी-भंडारी येथील तलावात नियमबाह्य मासेमारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव तालुक्यातील कंडारी-भंडारी तलावात नियमबाह्य पध्दतीने मासेमारी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर कंडारी ता. नांदुरा जि. बुलडाणा येथील पूजा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मत्स्य व्यवसाय विभाग बुलडाणाचे सहाय्यक आयुक्त स.इ.नायकवडी यांनी नोटीस बजावली आहे. यामध्ये संबंधित संस्थेला चार दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देशीत केले आहे.
७ आॅगस्टच्या तक्रारीकडे दुर्लक्ष!तलावात नियमबाह्य पध्दतीने करण्यात येत असलेल्या मासेमारीबाबत मत्स्यव्यवसाय विभाग बुलडाणा यांच्याकडे वारंवार तक्रार केली जात आहे. यामध्ये ७ आॅगस्टरोजी पुराव्यानिशी तक्रार दिली आहे. या तक्रारीत सहाय्यक संचालक नायकवडी यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे ते या तक्रारीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड तक्रारदारांकडून केली जात आहे.
पूजा मत्स्यव्यवसाय संस्थेला नायकवडी यांचे पाठबळ!कंडारी-भंडारी येथील तलावात नियमबाह्य पध्दतीने मासेमारी करणाºया संस्थेला सहायक आयुक्त स.इ.नायकवडी यांचे पाठबळ असल्याची तक्रार राजेंद्र मत्स्यव्यवसाय सह. संस्थेचे सचिव राजेश श्रावण सोनारे यांनी अमरावती विभागीय संचालकांकडे पुराव्यानिशी केली आहे. यासंदर्भातील व्हिडीओचित्रफितही तक्रारकर्त्यांनी व्हायरल केली आहे.