बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून नऊ एप्रिल रोजी दिवसभारात पाच कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात आता कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. गुरूवारी पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दोन व्यक्ती शेगावातील, प्रत्येकी एक खामगाव, देऊळगाव राजा आणि मलकापूर येथील आहेत. दरम्यान, मलकापूर येथील पॉझीटीव्ह आढळलेला रुग्ण हा अचानक त्रास होत असल्याने दोन दिवसापूर्वी स्वत:हून रुग्णालयात दाखल झाला होता, अशी माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली.
गेल्या दोन दिवसात एकूण ५७ स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ नमुने दिवसभरात प्राप्त झाले होते. त्यात एकूण पाच व्यक्ती पॉझीटीव्ह आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे यात मलकापूर येथील एका व्यक्तीचाही समावेश आहे. तो नागपूर येथे कामानिमित्त गेला होता, अशी माहिती मिळतेय. मात्र अधिकृत स्तरावर संबंधीत रुग्णही आरोग्य प्रशासनास माहिती देत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान आता बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १७ वर गेली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ६२६ नागरिकांची आता पर्यंत कोरोना संसर्गाच्या शंकेने तपासणी करण्यात आली आहे. पैकी ४११ व्यक्तींना सध्या क्वारंटीन करण्यात आलेले आहे. यात होम क्वारंटीन, हॉस्पीटल क्वारंटीन तथा इन्स्टीट्युशनल क्वारंटीनचा समावेश आहे. तर १८२ व्यक्तींच्या पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी १५७ व्यक्तींच्या स्वॅब नमुन्याचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यापैकी १७ जणांचे नमुने पॉझीटीव्ह आले असून यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा येथे पाच (एकाचा मृत्यू झालेला आहे.), चिखली येथे तीन, देऊळगाव राजा येथे दोन, सिंदखेड राजा येथे एक, खामगाव तालुक्यातील दोन आणि शेगाव तालुक्यात तीन आणि मलकापूरमधील एक अशा १७ जण कोरोना संसर्गाने बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.