लोणार सरोवरावर प्रथमच झाले ‘फ्लेमिंगो’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:25 PM2019-11-27T15:25:37+5:302019-11-27T15:25:46+5:30

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोचे  दर्शन लोणारकरांना झाले आहे.

Flamingo first appears on Lonar lake | लोणार सरोवरावर प्रथमच झाले ‘फ्लेमिंगो’चे दर्शन

लोणार सरोवरावर प्रथमच झाले ‘फ्लेमिंगो’चे दर्शन

googlenewsNext

- किशोर मापारी 
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : परदेशी पाहुणे फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरात आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींचे पाय जलाशयाच्या दिशेने पडू लागले आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोचे  दर्शन लोणारकरांना झाले आहे.
थंडीची चाहूल लागली, की आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीत हे पक्षी लोणार सरोवरात दाखल होत असतात. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. शेकडोंच्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात. भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. या पक्ष्यांचे थवेच्या-थवे असल्याने पाण्यात त्यांच्या जणू काही कवायती चालल्याचा भास होतो. काही वर्षापासून समाधानकारक पाऊस नसल्याने व खोल बोअरचे प्रमाण वाढल्याने लोणार सरोवरात पाणीसाठा कमी होत आहे. पाणथळीच्या जागा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी खाद्य मिळत नव्हते. त्यामुळे काही वर्षात पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. त्यामुळे पक्षीप्रेमींची निराशा झाली होती. त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. यावर्षीच्या समाधानकारक पावसाने सरोवर परिसर हिरवाईने नटलेला असल्याने मागील दोन दिवसांपासून फ्लेमिंगो दाखल झाल्याने पक्षी प्रेमींत उत्साहाचे वातावरण आहे.
महिनाभरात आणखी पक्षी दाखल होऊन रोहित पक्ष्यांच्या सुंदर ‘कवायती’ पाहायला मिळतील, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत. रोहित पक्षांचे आगमन उशिरा झाले असले, तरी या ठिकाणी सिगल, राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या आदी जातींचे पक्षी दाखल झाल्याने जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर चांगलेच बहरून गेले आहे. राज्यातील पर्यटकांसाठी पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.


फ्लेमिंगोचे वैशिष्ट्य
२६ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी मी लोणारकर टीमचे पक्षीमित्र विलास जाधव व संतोष जाधव यांनी सरोवराला भेट दिली असता रोहीत पक्षाचे अस्तित्व लोणार सरोवरात दिसून आले. रोहीत पक्षी काही विशिष्ट प्रकारचे शेवाळ खातात. यामुळे त्यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते, हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्षाची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्षाला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. एकंदरीत लोणार वन्यजीव अभयारण्य आता खऱ्या अर्थाने समृद्ध होत आहे.

Web Title: Flamingo first appears on Lonar lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.