पाझर तलावाच्या भिंतीतून झरे
By admin | Published: September 2, 2014 12:40 AM2014-09-02T00:40:27+5:302014-09-02T00:53:19+5:30
शेकडो एकर जमीन पिकासह वाहून जाण्याचा धोका
सिंदखेडराजा : तालुक्यातील आडगावराजा येथील पाझर तलावाची भिंत दमदार पावसामुळे अंदाजे ४ ते ६ फूट दबली आहे. पाझर तलाव्याच्या भिंतीमधून पाण्याचे झरे निर्माण झाले आहे. त्यामुळे पाझर तलाव फुटून परिसरातील शेकडो एकर जमीन पिकासह वाहून जाण्याचा धोका आहे. तालुक्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत आडगावराजा येथे पाझर तलाव बांधण्यात आलेला आहे. आडगावराजा या गावठाण पाझर तलावाचे बांधकाम सन २00३ ते 0४ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु झाले होते. सदर तलावाची लांबी २१0 मीटर असून, उंची सुमारे १२ मीटर आहे. पाझर तलावाच्या कामावर अंदाजे ८ ते १0 लाख रुपये खर्च होऊनदेखील त्यावेळेस बांधकाम अर्धवट होऊन बंद पडले होते. त्यानंतरचे बांधकाम सन २0१४ मध्ये सिंचन विभाग जि.प.अंतर्गत ठेकेदार जी.एस.चव्हाण यांनी सुरु केले; परंतु तलाव सुरु करण्यापूर्वी धारेमध्ये पाया खोदून त्यामध्ये काळी मातीचे प्रमाण कमी व मुरुम मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आला. सुरु असलेल्या मुसळधार पावसाने धरणात पाणी साचून तलावाची भिंत मध्यभागी ४ ते ६ फूट दबली. तलावाच्या भिंतीमधून पाण्याचे झरे वाहत असून, तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलावाचे कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून ११ लाख रुपयांचे बिल दिल्याची माहिती जे.ई.काळवाघे यांनी दिली आहे. तलावाचा सांडवा खोल करण्यासाठी ठेकेदार व संबंधित अधिकारी जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामाला लागले आहेत; परंतु तलाव फुटण्याच्या धोक्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी रंगनाथ जगताप यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.