दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का हवा! - विणा दिघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 05:47 PM2019-11-30T17:47:42+5:302019-11-30T17:48:39+5:30
दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का असला पाहिजे, असे मत अहमदनगर येथील आकाशवाणी निवेदिका विणा दिघे यांनी व्यक्त केले.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: निवेदक हे क्षेत्र खुप विस्तृत आहे. दररोज नवीन व्यक्तींच्या भेटी होतात. प्रत्येकाकडून काही तरी शिकायला मिळते. मातृभाषेवर प्रभुत्व हवे. निवेदक हा बहुभाषिक असावा. मात्र दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का असला पाहिजे, असे मत अहमदनगर येथील आकाशवाणी निवेदिका विणा दिघे यांनी व्यक्त केले. प्रगती वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे आल्या असता त्याच्यांशी साधलेला संवाद...
निवेदक म्हणून करिअर करायचे ठरवले होते का?
निवेदक म्हणून करिअर करावे असे ठरविले नव्हते. लग्नानंतर सासरी आल्यावर स्वत:चा एक व्यवसाय सुरुकेला. दरम्यान २००१ मध्ये अहमदनगर आशावाणी केंद्रावर महिला उद्योजक म्हणून मुलाखत प्रसारित झाली. केंद्राच्या प्रमुखांनी आवाज चांगला असल्याचे सांगून आकाशवाणीसाठी काम करण्यासाठी विचारले आणि तेथून हा प्रवास सुरु झाला.
महिला व युवतींसाठी या क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत?
निवेदक हे पुरुषी क्षेत्र असले तरी आज महिलांनी या क्षेत्रात उत्तूंग भरारी घेतली. महिला व युवतींसाठी इथे खुप कामे आहेत. डबिंग, व्हॉईस ओव्हरमध्ये चांगले करिअर करता येऊ शकते. त्यासाठी भरपूर मेहनत करण्याची तयारी पाहिजे.
निवेदकाच्या अंगी कुठले गुण असले पाहिजे ?
या क्षेत्रात प्रसंगावधान खुप महत्वाचे आहे. कायम जीवंत राहावे लागते. संपूर्ण कार्यक्रमाचे यश तुमच्यावर अवलंबून असते. अनेक कार्यक्रम सूत्र संचालनाच्या जोरावर यशस्वी झाले आहेत. निवेदकाला चौफेर वाचन आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य संदर्भ देता आले पाहिजेत. नेहमी चांगली पुस्तके वाचून काढावी.
मार्गदर्शनपर पुस्तक लिहिण्याचा मानस आहे का?
माझ्याकडे येणाºयांना मी मार्गदर्शन करते. परंतू सध्या तरी मार्गदर्शनपर पुस्तक लिहिण्याचा विचार नाही. भविष्यात नक्कीच लिहायला आवडेल. कामानिमित्त राज्यभर फिरस्ती सुरु असते. थोडी उसंत मिळाली की इतर कामे असतात.कुटूंबाची जबाबदारी सांभाळून सर्व आघाड्यांवर काम करावे लागते. या क्षेत्रात करिअर म्हणून खूप संधी आहेत. मेहनत घ्यायची तयारी ठेवल्यास नक्की यश मिळते. सध्या प्रशिक्षणाच्या नावावर जागोजागी केंद्र सुरु आहेत. मात्र मला वाटते की, स्वत:ची गुणवत्ता चांगली असली कोणत्याच प्रशिक्षणाची गरज नाही. स्वत:ला सिध्द करा, यश मिळते. केवळ क्षेत्र चांगले आहे म्हणून भागत नाही. त्यासाठी तुम्ही तितके परिपूर्ण असावे लागता. कार्यक्रमात तुम्हाला १०० टक्के देता यायला हवे. इथे कागद हातात धरुन अजिबात चालत नाही. दुसºयाचे कॉपी केलेले ज्ञान फार काळ टिकत नाही. आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढविण्याची आवश्यकता आहे.