नकली सोन्याची नाणी देऊन फसवणूक; सिनेस्टाईल पद्धतीचे ‘घेराव’ ऑपरेशन सक्सेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 10:41 AM2021-05-08T10:41:04+5:302021-05-08T10:41:10+5:30
Crime News : चार पथकांनी चौफेर घेराव घातला. त्यानंतर पाचव्या पथकाने अॅक्शन मोडमध्ये कारवाई केली.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सोन्याची नाणी...काळी हळद...मांडूळ साप, नागमणी अशा विविध गोष्टींचे आमीष दाखवून आर्थिक फसवूणक आणि नंतर मारहाण करणाऱ्या अंत्रज येथील टोळीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकांद्वारे सिनेस्टाईल घेराव ऑपरेशन राबविले. टोळीचे वास्तव्य असलेल्या वस्तीला एकाचवेळी चार पथकांनी चौफेर घेराव घातला. त्यानंतर पाचव्या पथकाने अॅक्शन मोडमध्ये कारवाई केली. त्यामुळे बुलडाणा पोलिसांचे घेराव ऑपरेशन यशस्वी झाले.
खामगाव विभागीय पोलिसांनी खामगाव शहर, खामगाव ग्रामीण, शिवाजीनगर, शेगाव शहर, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ०३ पोलीस निरीक्षक आणि ०२ ठाणेदारांच्या नेतृत्वात मोहीम राबविली. त्यामध्ये ९० पोलीस कर्मचारी, १६ महिला पोलीस, ०४ आरसीपी पथकाचा समावेश होता. पथक प्रमुखांना कारवाईसाठी केवळ सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
कोणतीही माहिती त्यांना पुरविण्यात आलेली नव्हती. जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या नेतृत्वात सलग ५ तास अचूकपणे ही मोहीम राबविण्यात आली. रस्त्याच्या दिशेने एका पथकाने नियोजितस्थळी धडक दिली. त्यामुळे काहीजण डोंगराच्या आणि शेताच्या दिशेने पळत सुटले. त्यांना चारही बाजूने असलेल्या पथकाने पकडून गावाकडे आणले.
यावेळी महिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिला पोलिसांची मदत घेण्यात आली. कारवाई दरम्यान, तांड्यातील एका महिलेने पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहत, विक्षिप्त अंगविक्षेप करत कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला पोलिसांनी खाक्या दाखविताच महिला भानावर आली. अंतर्गत वाद आणि टोळीयुद्धाचीही या कारवाईत पोलिसांना मदत झाली.
अंत्रज येथे एकापेक्षा अधिक टोळ्या सक्रिय!
खामगाव-चिखली मार्गावरील अंत्रज येथे नकली सोन्याचे आमीष देत फसविणाऱ्या आणि ग्राहकांना मारहाण करण्याची प्रॅक्टिस असलेल्या दोन-तीन टोळ्या सक्रिय असल्याचे प्रथमच पोलीस कारवाईत समोर आले. गुरुवारी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविल्यानंतर एका टोळीवर कारवाई केली.
n त्यावेळी अंत्रज तांड्यातील दुसऱ्या टोळीवरही कारवाई करा, असा वाद रंगला. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण तांड्याची झडती घेतली असता, मोठे घबाडच पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे अंत्रज येथे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या एकापेक्षा जास्त टोळी सक्रिय असल्याचे समोर आले.
खामगाव विभागीय पोलीस पथकाने सांघिक प्रयत्न केले. बुधवारी दुपारीच सर्च ऑपरेशन राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. मात्र, हे ऑपरेशन स्थगित करत, गुप्त पद्धतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजनबद्ध राबविलेल्या ऑपरेशनला यश आले.
- अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक,