साखरखेर्डा ते शेंदुर्जन रोडवर मालवाहू ट्रक फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:48+5:302021-09-09T04:41:48+5:30
पावसामुळे या भागातील रस्तेही जलमय झाल्याचे दिसून येते. राज्य महामार्गाची वाट लागली आहे. जून महिन्यापासून सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, ...
पावसामुळे या भागातील रस्तेही जलमय झाल्याचे दिसून येते. राज्य महामार्गाची वाट लागली आहे.
जून महिन्यापासून सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलमध्ये सतत पाऊस पडत आहे. धरण, तलाव, पाझर तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा सुरू आहे. सतत पावसामुळे विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरू लागले आहे. परिसरातील रस्ते चिखलमय झालेले आहेत. लव्हाळा - साखरखेर्डा - शेंदुर्जन - मलकापूर पांग्रा या २७ कि. मी. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबरच गायब झाले आहे. रोडच्या मधोमध पाण्याचे झरे वाहताना दिसत आहेत. भारत पेट्रोलियम जवळ असाच प्रकार दिसून आला असून, या रोडवरून चुरी घेऊन जाणारा मालवाहू ट्रक चक्क त्या रोडवर फसल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. संपूर्ण ट्रकमधील चुरी बाहेर काढल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने फसलेला ट्रक बाहेर काढण्यात आला.
अपघात वाढले
खामगाव ते साखरखेर्डा - दुसरबीड फाट्यापर्यंत राज्य महामार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची देखभाल करीत असले, तरी या रोडकडे पाहायला अधिकारी तयार नाहीत. मोठमोठी खड्डी पडल्याने दुचाकीचे अपघात सतत घडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता निखिल मेहेत्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.