मेहकर : वाढत्या औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, वायू, जल व ध्वनी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. कागदापासून गणरायाची मूर्ती साकारून येथील विश्वकर्मा गणेश मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.
गणेशमूर्ती तयार करताना पीओपी तसेच केमिकलयुक्त रंगाचा उपयोग केल्याने जलप्रदूषण होत असून, त्यासाठी आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. निसर्गावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी विश्वकर्मा गणेश मंडळाच्यावतीने कागदापासून गणरायांची मूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे. कागद, फेविकॉल, वाॅल पुट्टी व नैसगिक रंगांचा उपयोग करून गणरायांची मूर्ती तयार करण्यात आली आहे. विश्वकर्मा मंदिर येथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, ही मूर्ती तयार करण्यासाठी दीपक फुलउंबरकर, रूपाली राऊत, कुष्णा सासवडकर, गणेश राऊत यांनी परिश्रम घेतले.
पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे
सोशल मीडियावर या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागृती निर्माण करण्यात येत आहे. सर्वांनी निसर्गाला साथ देऊन पर्यावरणपूरक उत्सव साजरा करून होणारे दुष्परिणाम टाळावेत, असे आवाहन विश्वकर्मा गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश राऊत यांनी केले आहे.