गणेश मंडळांचा महावितरणाला शॉक
By admin | Published: September 2, 2014 10:46 PM2014-09-02T22:46:02+5:302014-09-02T23:00:20+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ४४ गणेश मंडळाने घेतली अधिकृत वीजजोडणी;अनधिकृत जोडणीविरूद्ध दामिणी पथकाची कारवाई.
बुलडाणा : गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी या वीज कंपनीच्या आवाहनाला गणेश मंडळांनी चांगलाच शॉक दिला असून आतापर्यंत जिल्ह्यात फक्त ४४ गणेश मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. ज्या मंडळाने अनधिकृत विज जोडणी केली आहे. अशा मंडळाला महावितरण कंपनीचे दामिनी पथक भेटून अधिकृत कनेक्शन घेण्याची सक्ती करीत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सार्वजनिक ८८१ गणेश मंडळाची स्थापना झाल्याची नोंदणी पोलिसांकडे झाली असली तरी आणखी छोटे-मोठे अनेक मंडळे आहेत की, ज्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आणि देखाव्यांची भव्यता पाहाता अनधिकृत जोडणी प्रसंगी धोकादायक ठरू शकते. अनेक गणेश मंडळे जवळच्या महावितरणच्या पोल वरून अनधिकृतपणे विज जोडणी करून विज घेतात. यावर्षी श्रीगणेश १0 दिवसासाठी भक्तांच्या भेटीला आले आहेत. या १0 दिवसासाठी कशाला अधिकृत कनेक्शन घ्यायचे, असा विचार करून अनेक गणेश मंडळाने अनधिकृत कनेक्शन घेतले आहेत. तर काहींनी मंडळातील सदस्य, परिसरातील व्यापारी, दुकाने, चक्की तसेच मिळेल तेथून तात्पुरते कनेक्शन घेत आहेत. बुलडाणा शहरातील फक्त १५ गणेश मंडळाने आजपर्यंत अधिकृतरित्या अर्ज देऊन विज कनेक्शन घेतले आहे. याशिवाजय खामगाव शहरात २४ तर मलकापूर शहरात ५ गणेश मंडळाने अनधिकृत कनेक्शन घेतले आहेत.
त्यावरून जिल्ह्यात अनधिकृत कनेक्शन घेणार्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे महावितरणाला लाखों रूपयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर येणार्या उत्सव काळात मोठय़ा प्रमाणात विजेचा वापर होणार आहे. त्यामुळे अशी अनधिकृत विज कनेक्शन धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत कनेक्शन घ्यावे, यासाठी महावितरणचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत.
अनधिकृत कनेक्शन धोकादायक असते. अधिकृत जोडणी घेतल्यास अपघात होण्याची शक्यता फारच कमी असल्याने गणेश मंडळांनी धोका पत्करू नये.अधिकृत जोडणी करण्यासाठी महावितरणचे दामिनी पथक मंडळांना भेटी देऊन अधिकृत कनेक्शनसाठी आवाहन करीत असल्याचे महावितरणचे अधिक्षक अभियंता किशोर शेगोकार यांनी सांगीतले आहे.
*कमी दरात विज उपलब्ध
धार्मिक उत्सवासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून दिली जात असल्याने गणेशोत्सवासाठीही अगदी कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकृत वीजजोडणी घेणार्या मंडळांना ३.७५ रुपये प्रतियुनिट याप्रमाणे वीज आकार आकारला जातो. दहा दिवसांसाठी मंडळांकडून पर किलोवॅट प्रमाणे एक हजार रुपये इतके डिपॉझिट घेतले जाते. हे डिपॉझिट बिल अँडजेस्ट करून उर्वरित रक्कम संबंधित मंडळाला चेकच्या माध्यमातून परत केली जाणार आहे.
*गणेशोत्सव काळात भारनियमन नाही
गणेशोत्सव काळात कुठेही भारनियमन केले जाणार नसल्याचे राज्य शासानाने जाहीर केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. ज्या ठिकाणी भारनियमन लागू आहे. त्या ठिकाणचे देखील भारनियमन गणेशोत्सव काळात बंद केले जाणार असल्याची माहिती आहे.