लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा(बुलडाणा) : वनस्पती औषधाच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या पैशांचे चौपट पैसे करून देणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या केशवशिवनी शिवारातील शेतात २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान पकडले. यावेळी टोळीतील एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एक लाखाच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या दुसरबीड-केशवशिवनी रस्त्यावरील केशवशिवनी शिवारातील एका शेतात पैशांचा पाऊस पाडणारी टोळी येणार असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोरे यांच्या नेतृत्वात पोलीस हेडकॉन्स्टेबल चांदुरकर, पोलीस नाईक विजय काकड, सानप आदींनी सापळा रचला. यावेळी विजय हरी पाटील रा. खेर्डा ता. रावेर जिल्हा जळगाव खान्देश यांच्याकडून २५ हजार घेऊन पैशांचा पाऊस पाडून चौपट एक लाख रुपये करून देतो म्हणून आरोपी शे.सत्तार शे.जब्बार रा. किन्होळा ता. चिखली, तालिफ गब्बार अहमद रा. चिखली, युनूस नादर पठाण खान रा.दुसरबीड, विजय तुकाराम गायकवाड रा. पलढग ता. मोताळा, तुळशीराम बालू चव्हाण रा. मोहेगाव ता. मोताळा, माधव ओंकार चव्हाण ता. मोताळा व सुरेश नथ्थू मराठे रा. बालवाडी. ता. रावेर जिल्हा जळगाव यांनी संगनमत करून एक लाख रुपयांचे २००० व ५०० रुपयांच्या नकली नोटांचे बंडल दिले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व आरोपींना रंगेहात पकडून एक लाख रुपयांच्या नकली नोटांचे बंडल जप्त केले. याप्रकरणी विजय हरी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध किनगावराजा पोलीस स्टेशनला भादंवि ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेवाळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे आरोपी जाळ्यात या प्रकरणातील फिर्यादी विजय हरी पाटील यांनी त्यांच्या बालपणीचा मित्र सुरेश नथ्थू मराठे याने बुलडाणा जिल्ह्यातील एक व्यक्ती वनस्पती औषधीच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडून रक्कम चारपट करून देत असल्याचे आमिष दाखविले. त्यामुळे विजय पाटील यांनी सोबत २५ हजारांची रक्कम सोबत घेऊन पैसे चौपट करून देणा-या शेख सत्तार शेख जब्बार याला भेटले. यावेळी त्याने विजय पाटील यांच्याकडून २५ हजार रुपये घेऊन मंत्रतंत्र व पूजापाठाच्या साहाय्याने याचे एक लाख रुपये करण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर विजय पाटील यांना एक थैली दिली. सदर थैलीत एक लाख रुपये असल्याचे सांगून ही घरी गेल्यावरच उघडायची, असे त्यांना सांगितले; मात्र आपली फसवणूक झाल्याचे विजय पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून रस्त्याने जात असलेल्या एका गाडीतील लोकांना थांबवून घडलेला प्रकार सांगितला. सदर गाडी स्थानिक गुन्हे शाखेची असल्यामुळे त्यांनी त्वरित किनगावराजा पोलिसांच्या साहाय्याने सापळा रचून घटनास्थळ गाठून सर्वच आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दाखविलेल्या तत्परतेमुळे पैशांचा पाऊस पाडणाºया टोळीस पकडण्यात यश आले आहे.