जिल्हा प्रशासनाकडून गणेश उत्सवाच्या अनुषंगाने अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. १० सप्टेंबर रोजी गणरायाची स्थापना झाली होती. दरम्यान, १९ सप्टेंबरला गणेश उत्सवाची सांगता झाली. अनेक ठिकाणी शनिवार व रविवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती. दरवर्षी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीतून विविध सामाजिक संदेश देण्यात येतात. परंतु, यंदा कोरोनामुळे मिरवणूकच रद्द झाल्याने सार्वजनिक मंडळांकडूनही गणरायाची मूर्ती थेट विसर्जन स्थळी नेण्यात आली. त्यानंतर त्याठिकाणी गणरायाची आरती करून भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. बुलडाणा शहरात सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली होती. त्या सर्व मंडळांनी साधेपणाने गणरायाचे विसर्जन केले.
बुलडाण्यातील सरकारी तलावावर गर्दी
दहा दिवस असलेल्या भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणातील गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने करण्यात आली. रविवारी अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी बुलडाणा शहरातील सरकारी तलावावर भक्तांनी गर्दी केली होती. बुलडाण्यातील मलकापूर रोडवरील तलाव, सरकारी बगीचा तलावावर बुलडाणेकरांनी कोरोनाचे नियम पाळत गणपती बाप्पांना निरोप दिला.
२३ वाहनांद्वारे निर्माल्याचे संकलन
गणरायाच्या निर्माल्याचे संकलन करण्यासाठी नगर पालिकेकडून बुलडाणा शहरातील प्रत्येक विसर्जन स्थळी वाहनांची व्यवस्था केली होती. एकूण २३ वाहने तलाव, विहीर व इतर विसर्जन स्थळाच्याठिकाणी उभी करण्यात आली होती. त्यामध्ये २० घंटागाड्या व तीन ट्रॅक्टरद्वारे निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
रात्री उशीरापर्यंत सुरू होते विसर्जन
बुलडाणा शहरातील सरकारी तलावाच्याठिकाणी रविवारी रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जन सुरू होते. याठिकाणी बुलडाणा नगर पालिकेकडून ५० विद्युत दिवे तलावाच्या परिसरात लावण्यात आले होते. यावेळी नगर पालिकेचे काही कर्मचारीही उपस्थित होते.