राहेरी बु : सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी गत वर्षापासून संकटात सापडलेले आहेत़ त्यातच या वर्षी अनेक बँकांनी शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केलेले नाही़ त्यामुळे, पीक कर्जांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची मागणी मनसेच्या वतीने १५ सप्टेंबर राेजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीयीकृत बँकांचे कार्यालय फोडण्याचा इशारा मनसेने निवेदनात दिला आहे़
सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कोरोनाचे संकट यामुळे बळीराजा हैराण झाला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आपल्याला शासनाकडून काही मदत मिळेल किंवा बँकांकडून पीक कर्ज मिळेल या आशेने शेतकऱ्यांची व्याजाने किंवा उसनवारी करून आपल्या शेतीची पेरणी केली. परंतु पेरणी होऊन जवळपास चार महिने होत आले तरीसुद्धा बॅँकांनी अद्यापही शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले नाही किंवा पीककर्जाचे पुनर्गठनसुद्धा केले नाही. सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज व पुनर्गठण प्रकरणे तत्काळ मार्गी लावावी, अन्यथा राष्ट्रीयीकृत बँकांचे कार्यालय फोडू, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने सिंदखेडराजाचे तहसीलदार यांना देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे, मनसे तालुकाध्यक्ष नीलेश देवरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव, गोपाल शेळके, अंबादास डिखुळे, अंकुश चव्हाण,महेश किंगरे,अभिदादा देशमुख, अनिल जाधव, महेंद्र पवार,घनश्याम केळकर,अंकुश गाडेकर व मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित हाेते.