स्वस्त धान्यासोबत किराणा मालाची भेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:17+5:302021-05-26T04:34:17+5:30
चिखली : कोरोनामुळे सर्वांचेचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गाला गत वर्षभरापासून काम नसल्याने अत्यंत वाईट परिस्थितीचा ...
चिखली : कोरोनामुळे सर्वांचेचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गाला गत वर्षभरापासून काम नसल्याने अत्यंत वाईट परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागत आहे. त्याची दखल घेत रा. काँ. जिल्हाध्यक्ष संजय गाडेकर यांनी आपले गाव तेल्हारा येथील गरजू मजुरांना किराणा माल देऊन आधार दिला आहे. त्यांच्या या उपक्रमास गावातील इतर दानशूरांचाही हातभार लागला आहे.
गत वर्षाच्या लॉकडाऊननंतर गत दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासनस्तरावरून अनेक प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. परिणामी सर्व व्यवसाय बंद असल्याने रोज मजुरीवर जीवन असणाऱ्यांसाठी हा अत्यंत खडतर काळ आहे. अनेक मजूर व कामगार यांच्या हातात काम नाही आणि त्यामुळे एक निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. आपल्या अवतीभवती असणाऱ्या अशा गरजू लोकांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक अल्पशी मदत करण्याचा निर्णय संजय गाडेकर यांच्या माध्यमातून तेल्हारा गावाने घेतला आहे. यानुषंगाने तेल्हारा येथे मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या गरजू लोकांना शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या अन्नधान्यासोबतच किराणा मालाच्या स्वरूपात मदत करण्यात आली आहे. यासाठी संजय गाडेकर यांनी पुढाकार घेत मदत गाेळा केली़ याप्रसंगी सरपंच किरण गाडेकर, माजी सरपंच माणिकराव गाडेकर, उपसपंच शिवकन्या कुटे, ग्रा. प. सदस्य बबनराव पानझडे, शे. रशीद, मालती ठोंबरे, बालू कुटे, मोहन मोसंबे, विष्णू कुटे, शे.लुकमान, भगवान आप्पा व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.