बुलडाणा : समाजातील हुंडा पद्धत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा मागणी करणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्यांची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे.
हुंडा स्वीकारण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे.
लग्न करताना नवऱ्या मुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने जणू विकतच घेत आहेत. जिल्ह्यात हुंड्याची परंपरा फारशी नसली, तरीही हुंडा मागत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत २०२० मध्ये ८५ गुन्हे दाखल झाले आहेत़, तसेच २०२१ च्या जूनपर्यंत २८ गुन्हे दाखल झाले आहेत़
पैशांच्या मागणीऐवजी आता साेने व इतर वस्तू मागण्यात येत आहेत़. मुलगा नाेकरीवर असल्यास त्याचे भावही जास्त आहेत़. त्यातही प्राध्यापक, डाॅक्टरही हुंडा घेण्यात आघाडीवर असल्याचे चित्र आहे. हुंडा मिळाला नाही किंवा मनासारख्या वस्तू मिळाल्या नाहीत, तर विवाहितांचा छळ करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
हुंडा म्हणायचा की पाेराचा लिलाव
हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लॉट, दागिने मागितले जातात.
लग्नात लागणारा खर्चही मुलींच्या वडिलांकडूनच घेणारे काही महाभाग समाजात आहेत़
सरकारी नाेकरीवर असलेली मुले सर्वाधिक हुंडा घेत असल्याचे चित्र आहे़. अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत
मुलाला नोकरीसाठी लागणारे डोनेशन मुलीच्या वडिलांनी द्यावे, व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पैसा मुलीच्या वडिलांनी द्यावा, बहुतांश कुटुंब माैल्यवान वस्तूंच्या रूपात हुंडा घेतात. आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून, गर्भश्रीमंतांपर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. अशिक्षितांपेक्षा शिक्षित लोक जास्त हुंडा मागताना दिसतात. हुंडा मागण्याचे स्वरूप बदलले आहे. लग्नात होणारा स्वर्च, डिजेचा खर्च, वरातीला लागणाऱ्या वाहनांचा खर्च, मंगल कार्यालयाचा खर्च मुलीच्याच वडिलांनी करून मुलाचे भविष्य घडवण्यासाठी हातभार लावावा, असे सांगितले जाते.
मुलीचे आई-वडीलही जबाबदार
समाजात हुंडा देणारे आहेत म्हणून मागणारेही आहेत़. नाेकरीवर असलेला जावई मिळावा, यासाठी मुलीचे आई-वडील कितीही हुंडा द्यायला तयार असतात़. त्यामुळे, हुंडा पद्धती समाजात टिकवून ठेवायला मुलीचे आई-वडीलही जबाबदार असल्याचे चित्र आहे. हुंडा मागणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिल्यास समाजातून हुंडा पद्धत बंद हाेण्यास मदत मिळणार आहे़
नवीन पिढी बदलतेय़
सध्याची युवा पिढी परिवर्तन करीत असल्याचे काहीसे दिलासादायक चित्र आहे. अनेक युवक पसंतीला महत्त्व देत आहेत़. हुंडा हा गाैण ठरत असल्याचे चित्र आहे; मात्र ही संख्या अजूनही फार कमी आहे. घरातील ज्येष्ठ लाेकच लग्न जुळवतात़. त्यात हुंड्याची मागणी माेठ्या प्रमाणात हाेते. युवकांनी हुंडा न घेण्याची शपथ घेतल्यास ही पद्धत समाजातून हद्दपार हाेणार आहे. अनेक मुलींच्या पालकांना आर्थिक कुवत नसतानाही माेठ्या प्रमाणात हुंडा द्यावा लागताे़, त्यासाठी कर्ज काढावे लागते. त्यामुळे ही हुंडा पद्धत बंद करण्याची गरज आहे.