कायमस्वरुपी ग्रामसेवक द्या : सरपंच पतीचे उपाेषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:03+5:302021-05-03T04:29:03+5:30
मोताळा : ग्रामसेवक महिन्यातून एक किंवा दोन दिवस गावाला भेट देतात, ग्रामपंचायत प्रशासनाला राजकीय द्वेषापोटी वरिष्ठ प्रशासकीय ...
मोताळा : ग्रामसेवक महिन्यातून एक किंवा दोन दिवस गावाला भेट देतात, ग्रामपंचायत प्रशासनाला राजकीय द्वेषापोटी वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयाकडून सहकार्य मिळत नाही, असा आरोप करत निपाणा येथील सरपंचांचे पती संतोष तांदुळकर यांनी महाराष्ट्र दिनी निपाणा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
निपाणाच्या सरपंच शारदा संतोष तांदुळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, निपाणा येथील ग्रामसेवक यांच्याकडून गावातील विकासकामांत सहकार्य मिळत नसून, संबंधित ग्रामसेवक महिन्यातून एक किंवा दोन दिवस गावाला भेट देतात. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होत आहे. वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही याची दखल घेतली गेली नाही.
प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्यास महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर सरपंच शारदा संतोष तांदुळकर व त्यांचे पती संतोष सीताराम तांदुळकर हे दोघे निपाणा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा न निघाल्यामुळे सरपंचांचे पती संतोष तांदुळकर यांनी शनिवारी निपाणा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी विस्तार अधिकारी राऊत व बोरकर यांनी तांदुळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सरपंच सोमवारी होणार उपोषणात सहभागी
निपाणा गावात शनिवारी आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. मात्र, परिस्थितीवर नियंत्रणासाठी ग्रामसेवक गावात नसल्याने सरपंच शारदा तांदुळकर यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे सरपंच शारदा तांदुळकर या शनिवारी उपोषणात सहभागी झाल्या नसून, सरपंचांचे पतींनी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास सोमवारी सरपंच शारदा तांदुळकर याही उपोषणात सहभागी होतील, असे त्यांनी प्रशासनाला लेखी कळवले आहे.
वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली?
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आर. एस. लोखंडे व मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. पी. मोहोड यांना सरपंच शारदा तांदुळकर यांच्या निवेदनातील मुद्द्यांवर नियमानुसार कार्यवाही करून सरपंच व सरपंचांचे पती यांना उपोषणापासून परावृत्त करून अहवाल सादर करण्याबाबत २९ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार निर्देश दिले. मात्र, त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला असून, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याची चर्चा सुरू आहे.