सुवर्णपदक विजेत्या मिहीर आपारचे बुलडाण्यात जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 11:50 AM2021-08-19T11:50:14+5:302021-08-19T11:51:06+5:30
Gold medalist Mihir Apar's welcome in Buldana : नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे सजविलेल्या वाहनात त्याची मिरवणूक काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पोलंड येथे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशीपमध्ये कंपाऊंड राऊंडमध्ये तणावातही दमदार कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या मिहीर नितीन आपारचे बुलडाण्यात १८ ऑगस्ट रोजी जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे सजविलेल्या वाहनात त्याची मिरवणूक काढली.
सुवर्ण पदक मिळविल्यानंतर बुलडाण्यात प्रथमच दाखल झाल्यानंतर त्याचे आ. संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीने भावपूर्ण स्वागत करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौक ते निवासस्थान अशी सजविलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. संजय गायकवाड, मिहीरचे आई-वडील, प्रशिक्षक चंद्रकांत इलग विजूभाऊ वानखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांच्यासह बुलडाण्यातील मोठा जनसमुदाय या मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिहीरच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात जल्लोष होत आहे.
भावनिक झालो होतो
अमेरिकेवर कंपाऊंड राऊंडमध्ये मात केल्यानंतर भारताला सुवर्णपदक मिळाल्याची जाणीव होताच भावनिक झालो होतो. नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हे ही सुचत नव्हते. माझ्या यशाचे श्रेय हे आई-वडील आणि प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे आहे. या यशाने भारावून न जाता सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावर भर राहील, असे मिहीर आपार याने यावेळी बोलताना सांगितले.
आर्चरी सेंटर कार्यान्वीत करणार
बुलडाण्यात आर्चरी सेंटर त्वरेने उभे करण्यास आपण प्राधान्य देणार असून त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून दिवाळीपर्यंत बुलडाण्यात आर्चरी सेंटर उभे राहील. या सेंटरमधूनच भविष्यातील सुवर्णपदक विजेते खेळाडू निर्माण होतील, अशी भावना आ. संजय गायकवाड यांनी मिहीरचा जयस्तंभ चौकात सत्कार करताना व्यक्त केली.