लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: केंद्र शासनाने खामगाव येथील गोदामावर पाठविलेले धान्य उतरविण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी भारतीय खाद्य निगमच्या विभागीय व्यवस्थापकांनी खामगाव येथील साठा अधिक्षकांना नोटीस पाठवून त्यांचे कान टोचले आहे. त्यामुळे खामगाव येथील भारतीय खाद्य निगम व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे.केंद्र आणि एफसीआयच्या संयुक्त विद्यमाने रविवारी होंशगाबाद (मध्यप्रदेश) येथून धान्य पाठविण्यात आले. त्यानंतर रविवारपासून गुरूवारपर्यंत तब्बल पाच दिवस खामगाव येथील गोदामावर मध्यप्रदेशातून आलेले आठ ट्रक उभे होते. याप्रकरणी धान्य वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराने वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. त्यानंतर एफसीआयच्या विभागीय व्यवस्थापकांनी खामगाव येथील साठा अधिक्षकांना नोटीस देत, त्यांनी कानउघडणी केली आहे.विभागीय व्यवस्थापकांनी या गंभीर आक्षेप नोंदविल्याचे दिसून येते. गोदामात पूर्ण जागा असतानाही गोदामाच्या आवारात धान्याचे ट्रक उभे असणे संयुक्तीक नाही. गोदामावर ट्रक उभे असण्याचे थेट परिमाण लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. कोविड-९० या विषाणू संक्रमणाच्या कालावधीत खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. याचे गंभीर परिणाम होणार होऊ शकतात, असेही भारतीय खाद्य निगमच्या विभागीय व्यवस्थापक बी.एम. राऊत यांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. ‘केंद्राकडून आलेल्या धान्याची खामगावात अडवणूक’ या मथळ्याखाली २९ मेच्या अंकात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच एफसीआयच्या खामगाव येथील गोदामावर चांगलीच खळबळ उडाली आहे.
वरिष्ठांची नोटीस प्राप्त होताच गोदामावर धावाधाव!धान्य अडवणूक प्रकरणी एफसीआयच्या वरिष्ठांची नोटीस प्राप्त होताच, खामगाव येथील गोदामावर एकच खळबळ उडाली. ट्रकमधून धान्य उतरविण्यासाठी धावपळ करण्यात आली. मात्र, एका ट्रकमधून धान्य उतरविण्यात आल्यानंतर पुन्हा धान्य उतरविणे थांबविण्यात आले. मात्र, वरिष्ठांनी पत्र दिल्याचे समजताच या ठिकाणी धान्य उतरविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.