लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात येत आहेत; मात्र तांत्रिक अडचणींमुळे नामनिर्देशनपत्र अपलोड करण्यात अडचण येत असल्यामुळे अर्ज सादर करण्याच्या दुसर्या दिवशी ६ फेब्रुवारीपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचार्यांची डोकेदुखी वाढली आहे.प्रशासनाचे सर्वच विभाग ऑनलाइन होत असल्यामुळे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी निवडणूक लढविणार्या उमेदवाराचे पारंपरिक पद्धतीऐवजी संगणकीकृत पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्रे भरण्यापासून उमेदवार निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही पार पडेपर्यंतचे सर्व टप्पे आयोगाच्या आज्ञावलीनुसार संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ३ सार्वत्रिक व १0२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार ५ ते १0 फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्रे ऑनलाइन भरणे, १२ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करणे, १५ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेणे, २५ फेब्रुवारी रोजी मतदान, २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणीची तारीख, ठिकाण जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करणे तर २७ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक कारणामुळे नामनिर्देशनपत्र अपलोड होत नसल्यामुळे इच्छुक उमेदवार अडचणीत आले आहेत.
बुलडाणा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूकबुलडाणा तालुक्यातील दहिद खुर्द, गुम्मी, कुंबेफळ, माळवंडी, नांद्राकोळी, उमाळा, रायपूर, साखळी खुर्द तसेच घाटनांद्रा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार बुलडाणा तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत; मात्र ऑनलाइन नामनिर्देशनपत्रे अपलोट होत नसल्यामुळे ऑफलाइन अर्ज घ्यावेत, अशी मागणी होत आहे.
निवडणूक आयोगाकडून ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरण्याचे आदेश आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी इंटरनेटला स्पिड असेल, त्यावेळी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करावेत. काही तांत्रिक अडचण असल्यास लवकरच सोडविण्यात येईल.- आर.डी.देशमुख, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा.